पुणे – जिल्हयातील खेड परिसरात एका मोक्याचे जागी असलेली जमीन मुलाने ज्येष्ठ नागरिक असलेल्या आईच्या नकळत परस्पर विक्री केली. मात्र, याबाबतची माहिती आईला झाल्यानंतर तिने पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक सेलकडे धाव घेत दाद मागितली. पोलिसांनी संवेदनशीलपणे प्रकरण हाताळत बाजार भावाप्रमाणे एक कोटीपेक्षा अधिक किंमत असलेली सात गुंठे जमीन महिलेस कागदपत्रांसह मिळवून दिली.
याबाबत ज्येष्ठ नागरिक सेलकडे 66 वर्षीय महिला सुमन (नाव बदलले आहे) यांनी अर्ज केला होता. सुमन यांच्या पतीचे 2017 मध्ये निधन झाले आहे. त्यांनंतर त्यांची वडीलोपार्जित जमीन त्यांचा मुलगा सुरेश याने आईस कोणतीही कल्पना न देता विक्री केली. या व्यवहारातील प्रत्येकी पाच लाख रुपये रक्कम त्याने आई व दोन बहिणींना दिली. याबरोबरच आणखी काही रक्कम येणे बाकी असल्याचे त्यांना सांगितले. त्या व्यवहारातील काही रक्कम येणार त्याकरिता खोटी कागदपत्रे तयार करुन त्यावर आईची सही घेऊन ही जमीन त्याने स्वत:च्या नावे करुन घेतली. त्यानंतर त्याने परस्पर बांधकाम सुरू केल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. आईने या जमिनीचा फेरफार कागदपत्रे काढली असता, मुलाने आई आणि बहिणीच्या नावाचे परस्पर हक्क सोडपत्र केल्याचे उघड झाले.
याबाबत सुमन यांनी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ज्येष्ठ नागरिक सेलकडे दाद मागितली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता बोडखे यांनी सुरेश यास चौकशीकरीता बोलवून घेत त्याचे समुपदेशन केले. ज्येष्ठ नागरिक कायदा समजावून सांगत त्याचे मनपरिवर्तन केले. त्यानंतर मुलाने कायदेशीर कारवाईचा बडगा टाळण्यासाठी संबंधित जमीन पुन्हा कायदेशीर कागदपत्रांसह आईच्या नावावर करुन दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, ज्येष्ठ नागरिक सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिनी बोडखे, हवालदार किशोरी केंगले यांच्या पथकाने ही कारवाई केली.