मुंबई – नुकतंच प्रदर्शित झालेला विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची सध्या खूप चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या सिनेमाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांना सिनेमा पाहून रडू कोसळल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सिनेमा आवडला असून त्यांनी या सिनेमाच्या टीमची भेट घेतली. आणि सिनेमा सर्वांनी आवर्जून पाहावा असं सुद्धा सांगितलं आहे. सध्या सर्वच ठिकाणी या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे. भिवंडीच्या काही थिएटरमध्ये दहशतवादी ‘बिट्टा’च्या तोंडचेकाही संवाद म्यूट केले जात असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
दरम्यान, या सर्व घटनेवर सिनेमात फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका जिवंत करणारा मराठमोळा अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ने सुद्धा प्रथमच आपले मत व्यक्त केले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान चिन्मय बोलत होता. यावेळी तो म्हणाला की…,”काही ठिकाणी सिनेमातले ठराविक संवाद म्यूट करून दाखवण्यात येत आहे, असं माझ्याही कानावर आलं. हे चुकीचं आहे.
बिट्टाच्या तोंडचे संवाद हा सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. सिनेमातलं ते एक कॅरेक्टर आहे आणि मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला आङे. मला नाही वाटत की त्यातल्या माझ्या तोंडच्या कुठल्याही संवादाने कुणाच्या भावना दुखावल्या जातील.’
तर चिन्मय पुढे म्हणतो… “आम्ही सगळ्यांनीच केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. या प्रकारे उस्फूर्त प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. सिनेमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. आम्हाला याचा आनंद आहे.” असं तो म्हणाला. ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमात या अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत.