कडकनाथ घोटाळ्याची व्याप्ती लाखोंच्या घरात

शिरूर तालुक्‍यातील गावांत शेतकऱ्यांची फसवणूक : गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडे परवानगी

शेरखान शेख

शिक्रापूर- महाराष्ट्रभर गाजत असलेल्या कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळा प्रकरणाचे लोन आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहचले आहे. शिरूर तालुक्‍यातील अनेक गावांत शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मात्र, याबाबत कोणावर गुन्हा दाखल झाला नसून पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरूर तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक होऊन शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे फसवणूक झालेले घोलपवाडी येथील शेतकरी धनंजय वडघुले व पोपट वडघुले यांनी सांगितले.

शिरूर तालुक्‍यातील टाकळी भीमा, तळेगाव ढमढेरे, घोलपवाडी, वाघाळे आदी भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कडकनाथ कोंबडी पालन करून कमी पैशात दुप्पट उत्पन्न मिळवा, या जाहिरातबाजीतून लाखो रुपये गुंतविले. त्यांनतर कंपनीकडे पैसे भरल्यानंतर कंपनी शेतकऱ्यांना कोंबडीचे पिल्ले देऊन त्या कोंबड्यांना लागणारे खाद्य, लस, भांडी, डॉक्‍टर भेट, व्यवस्थापनाचा समावेश करणार असल्याचे सांगितले. कोंबड्यांची अंडी कंपनीच खरेदी करणार असल्याचे ग्राहक शेतकऱ्यांना सांगितले होते. कंपनीच्या जाहिरातबाजीनंतर अनेक शेतकरी भुलून लाखो रुपये गुंतविले.

सध्या शिरूर तालुक्‍यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रकल्प उभे राहिले आहेत. महारयत कंपनीकडून शेतकऱ्यांना खाद्य पुरविले जात नाही. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली अंडी कंपनी घेऊन जात नाही. अनेक शेतकऱ्यांना खाद्य विकत आणून खायला घालण्याची वेळ आली आहे. तरीही कंपनीचे अधिकारी, कर्मचारी याकडे फिरकत नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी महारयत कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र, कार्यालय बंद झाले असल्याचे समोर आले आहे.

  • वरिष्ठांच्या परवानगीनंतर गुन्हे दाखल करू-शेलार
    शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले की, शिक्रापूर भागातील काही शेतकऱ्यांकडून कडकनाथ कोंबड्यांच्या फसवणुकीबाबत अर्ज आले आहेत. परंतु फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत आहे. गुन्हा दाखल करण्याच्या परवानगीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. वरिष्ठांची परवानगी मिळताच गुन्हे दाखल केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)