पुरंदर विधानसभेचा आखाडा शांतच

सोशल मीडियावरच कार्यकर्त्यांकडून वैयक्तिक पातळीवर चिखलफेक

सासवड- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास आता फक्त औपचारिकता राहिली आहे. तरीही महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतील पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ अद्याप शांतच आहे. पुरंदरचे विद्यमान आमदार जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप या दोघांचे नाव नेहमीच निवडणुकांमध्ये चर्चेत असतात. विजय शिवतारे यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्‍चित झाल्यातच जमा आहे. मात्र, पुरंदरच्या जागेचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पेच मात्र सुटायला तयार नसल्यामुळे कार्यक्रर्ते संभ्रमात आहेत.

कॉंग्रेसचेसंजय जगताप यांनी पुरंदरची जागा कॉंग्रेसला सुटणार असल्याचे जाहीर केले आहे. तरीही आघाडीची उमेदवारी त्यांच्याच पदरात पडणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. जर आघाडीने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी अनेक वेळा संजय जगताप यांनी बोलून दाखवलेली आहे. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे यांनी नुकत्याच सासवड येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर पुरंदरची जागा राष्ट्रवादीला सोडली नाही तर बंडखोरीचे सूतोवाच केले आहेत. जालिंदर कामठे यांच्या नाराजीमुळे सध्या तालुक्‍यातील प्रसारमाध्यमांमध्ये ही त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलेली आहे. त्यातच माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांचेही राष्ट्रवादीकडून उमेदवारीमध्ये नाव चर्चेत आहे.

पुरंदर तालुक्‍यातील राजकीय वातावरण हे सध्या फक्त सोशल मीडियावरच तापू लागल्याचे दिसून येत आहे. फेसबुक, व्हॉट्‌सअप यावरती राजकीय पक्षांच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांकडून वैयक्तिक पातळीवर देखील चिखलफेक होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या निवडणुकीआधीच सोशल मीडियावरील प्रचाराची पातळी खालावल्याचे दिसत आहे. वैयक्तिक पातळीवर येऊन शिवीगाळ करणे, मागची उणीदुणी काढणे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवरती टीका करणे हे प्रकारही वाढत चालले आहेत. एकंदरीत पुरंदर विधानसभा निवडणुकीचा आखाडा हा सध्या फक्त सोशल मीडियावरच रंगल्याचे दिसून येत आहे. सध्या विजय शिवतारे यांच्याकडून भूमीपूजनाचा सपाटा सुरू असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही त्यांच्या सत्ता असलेल्या जेजुरी व सासवड नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात भूमीपूजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

  • कार्यकर्त्यांना आघाडी, युती होण्याची वाट
    यातच राष्ट्रवादीचे चर्चेतील उमेदवार संभाजी झेंडे यांनी ही विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आघाडी घेतलेली आहे व गावपातळीवर जनसंपर्क वाढविण्यावर भर दिलेला आहे. मात्र, तालुक्‍यातील वातावरण सध्या शांत दिसत आहे. निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. मात्र राजकीय नेत्यांकडून कोणतीही ठाम भूमिका घेतली जात नसल्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांपर्यंत सर्व जण आघाडी आणि युती होण्याची वाट बघत आहेत.
  • पुरंदरमध्ये महायुती, आघाडी झाली नाही तर?
    भाजप-शिवसेनेची युती असूनही दोन्ही पक्षांनी पुरंदरवर दावा केला आहे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पुरंदर विधानसभा मतदारसंघावर दावा केला असल्यामुळे युती आणि आघाडी होणार का? अशीच शंका निर्माण झाली आहे. जर पुरंदर पुरंदर विधानसभा मतदारसंघात महायुती व आघाडी झाली नाही तर शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेमध्ये प्रमुख लढत होईल.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×