- कामगारांसह सर्व संघटनांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
पुणे – शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देत मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील कामकाज बंद राहणार आहे. याबाबतची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरने दिली आहे. या बंदला श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. मात्र, दोन्ही बाजार सुरू राहणार असल्याचे संघटनेकडून कळविण्यात आले आहे.
दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील विविध घटकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यात मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजार बंद राहणार आहे. याविषयी चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, “भारत बंदमध्ये आम्ही सहभागी आहोत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. बाजार समिती आवारात शेतीमाल विक्रीवर सेस आणि इतर शुल्क आकारण्यात येणार आहे. बाजार समितीच्या आवाराबाहेर मात्र कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे बाजार आवारातील व्यापार संपण्याची शक्यता आहे. बाजार आवारही सेसमुक्त करावा,’ अशी आमची मागणी आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, “शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, बाजार सुरूच राहणार आहे. देशभरातून निघालेल्या भाजीपाल्याच्या सुमारे 80 गाड्या रस्त्यात आहेत. तो शेतकऱ्यांचाच माल आहे. तो माल उतरवून ने घेतल्यास सडण्याची शक्यता आहे. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा पाठिंबा द्यायचा. दुसरीकडे शेतकऱ्यांचा माल सडवायचा योग्य नाही. त्यामुळे बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’
अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, “शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, फुले ही नाशवंत आहेत. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बाजार सुरूच राहणार आहे.’
या कामगार संघटना बंदमध्ये होणार सहभागी
मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, महात्मा फुले कामगार संघटना, मार्केटयार्ड टेम्पो संघटना, महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन या सर्व संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. सोमवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून बंदमध्ये सहभागी होणार असून, मंगळवारी सकाळी 10 वाजता बाजार समिती मुख्यालयासमोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. याबाबतची माहिती संतोष नांगरे, हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरघे, गोरख मेंगडे, संपत धोंडे, सागर खिलारे, गणेश जाधव यांनी दिली
…मात्र, दुकाने सुरूच राहणार
शहरातील व्यापारी आणि व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना पुणे व्यापारी महासंघाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, व्यापाऱ्यांची दुकाने सुरूच राहणार असल्याचे संघटनेकडून कळवण्यात आले आहे. याविषयी अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया म्हणाले, “शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. मात्र, करोनामुळे व्यावसायिकाचे यापूर्वीच मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार दुकाने बंद न ठेवता आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’