दखल : रजनीकांत हा नभी उगवला

-हेमंत देसाई

जयललिता पुन्हा सत्तेवर आल्यास परमेश्‍वरही तमिळनाडूला वाचवू शकणार नाही, असे उद्‌गार रजनीकांत यांनी 1996 साली काढले होते. त्यांच्या या टीकेचा जबरदस्त परिणाम झाला. जयललिता यांचा पराभव झाला आणि द्रमुक व तमिळ मानिला कॉंग्रेस यांचे सरकार सत्तेवर आले. तेव्हापासूनच रजनीकांत आज ना उद्या राजकारणात येणार, असे बोलले जाऊ लागले.

तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायक रजनीकांत यांनी आपण आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर रोजी ते या नव्या राजकीय पक्षाची अधिकृतपणे घोषणा करणार आहेत. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता; परंतु वेल्लोर जिल्ह्यातील समर्थकांनी, त्यांनी राजकारणात यावे, अशा आशयाची पोर्स्टस लावली होती.

वास्तविक रजनीकांत मागच्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. रजनीकांत व कमल हासन एकत्रितपणे काम करतील, अशी शक्‍यताही व्यक्‍त केली जात होती. दुसरीकडे, रजनीकांत यांनी करोनाकाळात प्रचार करू नये, तसेच अजिबात प्रवास करू नये, असा सल्ला त्यांच्या डॉक्‍टरांनी दिला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. खरे तर, रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्येच आपण राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता व करुणानिधी यांच्या निधनानंतरची ही गोष्ट. परंतु लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नाही. मात्र तामिळनाडू विधानसभेची आगामी निवडणूक त्यांचा पक्ष लढवणार असल्याचे बोलले जाते.

चार वर्षांपूर्वी रजनीकांत यांचा काबाली नावाचा चित्रपट आला. त्यात त्यांनी डॉनची भूमिका केली आहे. एका दृश्‍यात तो खलनायकाला बडवून काढतो आणि उद्‌गारतो, “त्यांना सांग की मी परतलो आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मी निघून गेलो होतो, तेव्हा इतकाच अजूनही माझा जोर कायम आहे.’ कदाचित वास्तवातील रजनीकांत सर्व राजकीय पक्षांना हाच संदेश देत असावा; परंतु 1996 व 2021 मध्ये मोठाच फरक आहे. रजनीकांत सत्तरीत प्रवेश करत आहेत आणि आता ते काही झंजावाती प्रचार करण्याच्या वयातही नाहीत. जेव्हा जेव्हा रजनीकांत यांचा एखादा चित्रपट येतो, तेव्हा तेव्हा त्यातल्या संवादांचा राजकीय अर्थ काढला जातो. केवळ तमिळनाडूतच नव्हे, तर संपूर्ण दक्षिणेत व विदेशात त्यांचे फॅन क्‍लब आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत रजनीकांत राजकारणात पदार्पण करणार, अशा कंड्या अधूनमधून पिकतच आल्या. त्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न रजनीकांत यांनी कधीही केला नाही. कारण या अफवांमुळे त्यांच्या चित्रपटांचा गल्लाही चांगला जमतो. रजनीकांत काहीही करू शकतात, यावर त्यांच्या चाहत्यांचा विश्‍वास आहेच, पण त्यांना स्वतःलाही तसा आत्मविश्‍वास आहे असे दिसते.

1999 साली रजनीकांत यांचा “पडायप्पा’ नावाचा चित्रपट आला होता. त्यातील एका प्रसंगात कॉकटेल पार्टी रंगात आलेली असते, तेव्हा एक राजकारणी व एक उद्योगपती चित्रपटातील रजनीकांत यांना राजकारणात प्रवेश करण्याची गळ घालतात. रजनी त्यांना विचारतो, “आपण पार्टी सुरू करायची का?’ त्यावर तो राजकारणी रजनीकांतचे पाय पकडून, “थलैवा!’, असे आनंदाने चित्कारतो. त्याबरोबर रजनीकांत म्हणतो, “मी केवळ विचारलं, आपण बर्थडे पार्टी सुरू करू या का?’

राजकारण ही गटारगंगा आहे आणि त्यात प्रवेश करून मी चूक केली, असे उद्‌गार एकेकाळी अमिताभ बच्चन यांनी काढले होते. दक्षिणेत चिरंजीवी यांनी देखील हा प्रयोग केला होता. परंतु राजकीय परिवर्तन आवश्‍यक आहे आणि तमिळनाडूचे भाग्य बदलण्याची हीच वेळ आहे, असे मत रजनीकांत यांनी नुकतेच चेन्नई येथे व्यक्‍त केले; परंतु गेल्या मार्चमध्ये विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही, असे त्यांनीच जाहीर केले होते. मला सत्तेची कोणतीही हाव नाही, हे सांगण्याचा हेतू त्यामागे होता.

मग ते कोणालातरी मुख्यमंत्री म्हणून उभे करून आपल्या चाहत्यांचे समर्थन त्यासाठी घेणार आहेत का? तमिळनाडूतील राजकीय नेते थेवर, गौंड, वणियार (ओबीसी व मागास जाती) किंवा अनुसूचित जातीच्या मतदारांना समोर ठेवून राजकारण करत असतात; परंतु रजनीकांतसारखा महानायक एका विशिष्ट जातीला केंद्रवर्ती ठेवून राजकारण न करता, आपल्या सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना समोर ठेवून राजकारण करण्याची अधिक शक्‍यता आहे. मात्र आज जे 15-20 वर्षांचे तरुण-तरुणी आहेत, त्यांच्या दृष्टीने रजनीकांत हा कदाचित महत्त्वाचा विषय नसेलच. तसे असते, तर “पेट्टा’ वा “दरबार’ हे त्यांचे अलीकडील चित्रपट यशस्वी ठरले असते.

रजनीकांत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते. त्यांच्या राजकारणप्रवेशाचे भाजपने स्वागतच केले आहे. तामिळनाडूत अण्णाद्रमुक आणि भाजप यांची आघाडी आहे. जयललिता यांचा पराभव करण्यासाठी पूर्वी रजनीकांत यांनी द्रमुकला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांची भूमिका बदललेली दिसते. हैदराबाद महानगरपालिकेत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपचा आत्मविश्‍वास उंचावला असून, तमिळनाडूतदेखील आपले बळ वाढवण्यासाठी भाजप शक्‍य त्या सर्व युक्‍त्या योजेल, यात शंका नाही. 2006च्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजयकांत यांच्या डीएमडीकेने साडेआठ टक्‍के मते मिळवली होती, पण त्यांना फक्‍त एक जागा मिळाली होती. अण्णाद्रमुकविरोधी मतांमध्ये फूट घडवण्यासाठी 2016 साली वायको व डावे पक्ष यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी निर्माण करण्यात आली होती. त्याचा फायदा होऊन, जयललिता यांना पुन्हा सत्तेत बसता आले होते.

रजनीकांत हे आध्यात्मिक राजकारण करत असून, ते भाजपच्या विचारांच्या अधिक जवळचे आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास भाजपचीच काही मते त्यांच्याकडे वळतील. द्रमुक हा नास्तिकवादाचा पक्ष आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे द्रमुकची मते रजनीकांतकडे वळणार नाहीत. अशावेळी रजनीकांत यांचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे भाजपलाच ठरवावे लागेल!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.