पणजी – जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रतिष्ठेच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्तात “इफ्फी’ला (Iffi) सोमवार पासून सुरुवात होत आहे. कान, बर्लिन आणि व्हेनिस यांच्यासारख्या आंतरराट्रीय चित्रपट महोत्सवांच्या तोडीचा हा महोत्सव आहे. (Film Festival)
जागतिक चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार (Satyajit rey award) जागतिक चित्रपट क्षेत्रातील मान्यवर असलेले हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना प्रदान केला जाणार आहे. यावेळी त्यांची पत्नी आणि नामवंत अभिनेत्री कॅथरिन झिटा जोन्स यांच्यासोबत इफ्फीमध्ये उपस्थित असतील.
या महोत्सवामध्ये 270 पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. 54व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय विभागात 198 चित्रपट असतील. गेल्या वेळच्या म्हणजे 53व्या इफ्फीपेक्षा यंदाच्या महोत्सवातील चित्रपटांची संख्या 18 ने जास्त आहे. यामध्ये 13 वर्ल्ड प्रिमिअर, 18 आंतरराष्ट्रीय प्रिमिअर, 62 आशिया प्रिमिअर आणि 89 भारत प्रिमिअर असतील. यंदाच्या इफ्फीसाठी 105 देशांमधून विक्रमी 2926 प्रवेशिका आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या आंतरराष्ट्रीय प्रवेशिकांच्या तिप्पट आहे. इंडियन पॅनोरमा विभागात भारतातील 25 फीचर फिल्म आणि 20 बिगर फीचर फिल्म्स दाखवल्या जातील. आत्तम हा मल्याळी चित्रपट फीचर विभागातील उद्घाटनाचा चित्रपट असेल आणि बिगर फीचर विभागात मणिपूरचा ऍन्ड्रो ड्रीम्स हा चित्रपट असेल.
या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट वेब मालिका पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यासाठी 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन 10 भाषांमधल्या 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
जगभरातील आकर्षक माहितीपटांचे संकलन असणारा एक डॉक्यु-मोन्ताज विभाग देखील यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. माहितीपट क्षेत्रात भारताचा ऑस्कर प्रवेश आणि आजच्या काळात चित्रपट निर्मितीमध्ये माहितीपटांचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या विभागाचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय, राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत भारतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या खराब झालेल्या सेल्युलॉइड रील्समधून जागतिक दर्जाचे जतन केलेल्या 7 जागतिक प्रीमियरचा क्लासिक्स विभाग देखील सादर केला जाणार आहे. या विभागात 3 आंतरराष्ट्रीय पुनर्संचयित चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील.
प्रख्यात चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि अभिनेत्यांसोबत 20 पेक्षा जास्त ‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन कन्व्हर्सेशन’ सत्र असणारा इफ्फी महोत्सव या वर्षी चाहत्यांसाठी एक रोमांचक पर्वणी सादर करणारा ठरणार आहे.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या गाला प्रिमियर या उपक्रमात या वर्षी 12 गाला प्रिमियर आणि 2 विशेष वेब सिरीज प्रिमियर सादर होणार आहेत. इफ्फीमधील या चित्रपट प्रीमियरमध्ये त्यातील कलाकार आणि प्रतिभावंत आपापल्या चित्रपटांच्या जाहिरातीसाठी इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरतील.