- एकाच दिवशी लुटमारीचे चार गुन्हे दाखल
- पहाटे आणि रात्री कामगारांना करताहेत “टार्गेट’
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहन चोरी नंतर आता आता चोरट्यांनी आपला मोर्चा जबरी चोरीकडे वळविला आहे. जबरदस्तीने मोबइल फोन आणि खिश्यातील रक्कम हिसकाविण्याचे एकाच दिवशी चार गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व घटना भोसरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. विशेष म्हणजे पहाटे कामावर चाललेल्या किंवा रात्री कामावरुन परतणाऱ्या कामगारांना गुन्हेगार आपले “टार्गेट’ बनवित आहेत.
शिवदास सुनील वाघ (वय 21, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि. 19) पहाटे पावणे सहा वाजता फिर्यादी वाघ हे भोसरी येथील हॉटेल वनराज येथून पायी चालत कामावर जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी वाघ यांच्या हातातील चार हजारांचा मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.
निलेश शिवराम चव्हाण (वय 36, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि. 18) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी चव्हाण गुडविल चौक, कासारवाडी येथून कामावरून घरी जात होते. त्यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या चार चोरट्यांनी चव्हाण यांच्या हातातील 10 हजारांचा मोबाइल फोन तर दुसऱ्या दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने चव्हाण यांच्या खिशातून 20 हजारांची रोख रक्कम चोरून नेली.
तिसऱ्या घटनेत किरण बाळासाहेब शिरवाळे (वय 21, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) यांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 15 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजता फिर्यादी शिरवाळे कामावर पायी चालले होते. लांडेवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा दहा हजारांचा मोबाइल फोन हिसकावून नेला. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
दुचाकी पाडून लूटमार
चौथ्या घटनेत विवेकांनद सनमुखआप्पा स्वामी (वय 29, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोपान अशोक कोरडे, प्रवीण अशोक कोरडे (दोघे रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 20) सायंकाळी सात वाजता फिर्यादी स्वामी यांनी एमआयडीसी भोसरी येथील इंद्रायणी स्वीट होम समोर त्यांची दुचाकी पार्क केली. त्यावेळी आरोपींनी विनाकारण स्वामी यांना धक्का देऊन त्यांची दुचाकी पाडली. त्यानंतर स्वामी यांना शिवीगाळ करून हाताने व लोखंडी स्पॅनरने मारहाण केली. तसेच स्वामी यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची साखळी आणि तीन हजारांचा एक मोबाइल फोन जबरदस्तीने चोरून नेला. उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे तपास करीत आहेत.