#IPL2020 : बेंगळुरूसमोर आज हैदराबादचे चॅलेंज

दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा संघ तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबादचा संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. आज या दोन संघात होत असलेल्या सामना पॉवरहिटर्स फलंदाजांत होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यातील विजयासह स्पर्धेच विजयी सलामी देण्यासाठी सज्ज आहेत. 

सामना :- रॉयल चॅलेंजर बेंगळुरू विरूध्द सनरायझर्स हैदराबाद

सामन्याची वेळ सायंकाळी : 7ः30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
ठिकाण : दुबई
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टसवर

बेंगळुरूबाबत बोलायचे तर कोहलीकडे नेतृत्व असले व संघात एबी डीविलियर्ससारखे तगडे फलंदाज असले तरीही गेल्या 12 स्पर्धांमध्ये त्यांना सरस कामगिरी करण्यात यश आलेले नाही. हा चोकर्सचा शिक्‍का पुसून काढण्यासाठी यंदा कोहलीला संपूर्ण संघाची धुरा आपल्या खांद्यावर वाहावी लागणार आहे. 

त्याला साथ देण्यासाठी देवदत्त पड्डीकल, शिवम दुबे यांच्यासारखे दर्जेदार फलंदाज आहेत. मात्र, त्यांच्याकडून कशी कामगिरी करून घ्यायची हेदेखील कोहलीलाच बघावे लागणार आहे. त्यामानाने हैदराबादचा संघ समतोल वाटत आहे. त्यांनी 2016 साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांनी सातत्याने सरस कामगिरी केली आहे.

अर्थात त्यांना गेल्या चार वर्षांत पुन्हा विजेतेपद मिळवता आले नसले तरीही वॉर्नरच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ बेंगळुरू संघापेक्षाही जास्त समतोल बनला आहे. त्यांच्याकडे नवोदित मनिष पांडे, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श व इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो असे हुकमी एक्के असल्याने मधल्या फळीत आक्रमक फलंदाजीची त्यांना चिंता राहणार नाही.

नाव मोठे लक्षण खोटे…. 

बेंगळुरू संघाला आजवर स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यात एकदाही यश आलेले नाही. संघात कोहली, डीविलियर्स असे बडे खेळाडू संघात असूनही अपयशाने त्यांची पाठ अद्याप सोडलेली नाही. त्यामुळे नाव मोठे व लक्षण खोटे असे चित्र त्यांच्याबाबत निर्माण झाले आहे. त्याचबरोबर ख्रिस गेलसारखे फलंदाज अन्य संघाकडे गेल्याने त्यांची मधली फळी यंदाही कमकुवतच बनली आहे.

वॉर्नरच्या फॉर्मची चिंता….

या स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने संघाला अनेकदा एकहाती विजय मिळवून दिले आहेत. मात्र, त्याचा यंदाच्या मोसमातील अपयशाचा पाढा कायम असल्याने या स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो यावरच त्यांच्या संघाचे यशापयश अवलंबून आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजय मिळविल्यानंतर या स्पर्धेतील विविध संघात करारबद्ध झालेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अमिरातीत दाखल झाले आहेत. वॉर्नरही आता पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धचे अपयश विसरून तो या स्पर्धेत यशस्वी होणार का, हाच मोठा प्रश्‍न हैदराबादसमोर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.