पुणे – “सेरेब्रल पाल्सी’ आजारात शरीराची हालचाल करणेही त्रासदायक असते, हा मुलगा चालूही शकणार नाही, असे डॉक्टरही सांगत होते. परंतु, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर कणाद या 13 वर्षाच्या मुलाने हिमालयातील 13000 फुटांचा अवघड ट्रेक पूर्ण केला. त्याच्या या यशाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
पुण्यातील कनाद पिंपळनेरकर याने गंगोत्री ते गोमुख हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करीत त्याच्यासह या बाजाराबाबतचे ठोकताळे बदलले आहेत. मेंदूला झालेल्या दुखापती अथवा विकारामुळे शरीराची हालचाल करणे त्रासदायक ठरणारा “सेरेब्रल पाल्सी’ हा अतिशय त्रासदायक स्वरूपातील आजार आहे.
या आजारामुळे व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. मात्र, अशा आजाराने ग्रस्त असलेल्या कणाद याने वयाच्या 13व्या वर्षी गढवाल हिमालयातील ट्रेक आणि चंद्रशीला पर्वत चढाई करुन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या चढाईत अरुंद पायवाट, अंगावर येणारा चढ आणि दाट धुक्यासोबत वाहणारे अतिथंड वारे अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, जिद्दीच्या जोरावर कणाद याने ही चढाई यशस्वीपणे पूर्ण केली.
आजवर कोणत्याही सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलाने अशी कामगिरी केली नसल्याने कणाद याने हिमालयात केलेल्या या चढाईची आशिया बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेने दखल घेवून त्याला ग्रॅंड मास्टर या किताबसह, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले आहे.
विशेष मुलांची आवड लक्षात घ्यावी….
हा मुलगा चालू शकणार नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, असे असूनही कणाद नुसता चालला नाही, तर हिमालयातील एक अवघड चढाई त्याने यशस्वीपणे पार पाडली. यामुळेच आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये याची नोंद झाल्याने आमचाही आत्मविश्वास आणि आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष मुलांच्या पालकांनी या मुलांची आवड लक्षात घेऊन वाव दिल्यास प्रत्येकाला, असे यश प्राप्त करणे शक्य आहे, अशी भावना कणाद याच्या आई दर्शना आणि वडील प्रशांत पिंपळनेरकर यांनी व्यक्त केली.