नवी दिल्ली – देशातील सक्रिय कोविड बाधितांची संख्या सतत कमी होत असल्यामुळे एकूण सक्रिय कोविड रुग्णांच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. देशातील एकूण कोविड बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करता त्यातील फक्त 13.75 टक्के रुग्ण सध्या सक्रिय असल्याचे दिसून आले आहे.
सक्रिय रुग्णांच्या घसरत्या दरासोबत, रोगमुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर वाढताना दिसत आहे. देशात कोविड संसर्गातून रोगमुक्त झालेले एकूण 56 लाख 62 हजारांपेक्षा थोडे अधिक रुग्ण आहेत.
सध्या देशातील बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्या एकूण संख्येत 47 लाख 43 हजारांपेक्षा अधिक अंतर दिसून आले आहे. रुग्ण रोगमुक्त होण्याच्या वाढत्या प्रमाणासोबतच हे अंतर वाढताना दिसत आहे.
राष्ट्रीय रोगमुक्तता दर वाढून आता 84 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासांत रोगमुक्त झालेल्या 75 हजार जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून, या कालावधीत 61 हजार नव्या कोविड बाधितांची नोंद झाली आहे.
देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या नव्याने कोविड बाधित रुग्णसंख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 74 टक्के रुग्ण देशातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या 10 राज्यांमधील आहेत. फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 13 हजार कोविडबाधित रोगमुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 61 हजार 267 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 10 हजारापेक्षा जास्त बाधित नोंदले गेले, त्याखालोखाल कर्नाटक राज्यात 7 हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या 24 तासांत 884 कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.