दीपेश सुराणा
बेशुद्धावस्थेत सापडलेल्या उडिसाच्या तरुणावर वायसीएममध्ये उपचार
पिंपरी – डोक्याला मार लागल्याने जखमी अवस्थेत देहुरोड येथे रस्त्याच्या कडेला पडलेल्या तरुणाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. या तरुणाचे शहरात कुणीही नसताना सामाजिक संघटनांच्या स्वयंसेवकांनी या तरुणाची सलग 23 दिवस सेवा केली. तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टर व स्टाफने देखील आवश्यक ते सर्व उपचार करत तरुणाला जीवनदान दिले. तरुण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला स्वयंसेवकांच्या मदतीने उडीसा येथील त्याच्या मूळ गावी पाठविण्यात आले.
चित्रा सिंग (वय-30) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. हा तरुण डोक्याला मार लागल्याने देहुरोड येथे 25 जुलैला दुपारी 12:30 च्या सुमारास रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याला तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून सचिन कोळेकर यांनी 108 क्रमांकाला दूरध्वनी करून ऍम्ब्युलन्स बोलावली. त्यानंतर या तरुणाला यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर सलग 23 दिवस वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याचे कोणीही नातेवाईक नसल्याने रूग्णालयामध्ये त्याची पूर्ण देखरेख ” रिअल लाईफ-रिअल पीपल’ चे सामाजिक कार्यकर्ते एम. ए. हुसैन, महापालिकेचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, उल्हास चांगण, रेणुका शिंदे यांनी केली. त्याच्या जेवणाची मोफत सोय तसेच, आवश्यक शारीरिक स्वच्छता करण्यात आली.
वाढलेली दाढी, डोक्यावरील अस्ताव्यस्त केस, अस्वच्छ कपडे अशा अवस्थेत सापडलेल्या या तरुणाला रूग्णालयात आल्यानंतर त्याची कटींग, दाढी करण्यात आली. बरा झाल्यानंतर तरुणाला 17 ऑगस्टला कोणार्क एक्सप्रेसने उडीसा येथे पाठविण्यात आले. स्वयंसेवक मिलिंद माळी त्यांना घेऊन गेले. तरुणाला संस्थेकडून रेल्वेचे तिकीट काढून देण्यात आले. तसेच, प्रवास खर्च आणि दोन जोड कपड्यांची कपडे भेट देऊन रवाना करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात गेल्या महिन्यात तीन निराधार व्यक्तींवर उपचार करून देहूगाव येथील गेथसेमेन वृद्धाश्रमात सोडण्यात आले. घरातील व्यक्तीच काही वेळा रूग्णांना सोडून निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आमच्याकडून आम्ही रुग्णांना आवश्यक मदत उपलब्ध करून देत असतो.
– महादेव बोत्रे, महापालिकेचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते.