थेऊर – पिंपरी सांडस (ता. हवेली) च्या हद्दीतील भीमा नदी किनाऱ्यालगतच्या पुलाजवळ शीर, तसेच दोन्ही हात कोपरापासून आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून छाटलेल्या मृतदेहाच्या शीराचा आणि हाताचा भाग उरुळी कांचन येथील जुन्या तांबेवस्ती नजीकच्या ओढ्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
संतोष ऊर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45 , रा. भवरापूर, ता. हवेली) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गायकवाड याचा मासेमारीचा व्यवसाय होता. मंगळवारी (दि. 1) रोजी बहिणीकडे जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. लोणी काळभोर पोलिसांना रविवारी (दि. 6) दुपारी चार वाजता स्थानिक नागरिकाने माहिती दिल्याने पोलिसांना संतोष गायकवाड याचे शीर व एका हाताचा भाग सापडला आहे.
अद्याप या मृतदेहाचा एक हात व दोन्ही पाय गायब असल्याने या खुनाच्या तपासाचा उलगडा होणे बाकी आहे. या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, लोणीकंद गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम. के. पाटील, लोणी काळभोरचे उपनिरीक्षक सदाशिव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.