‘रेमडेसिवीर’बाबत ‘तो’ मेसेज चुकीचा; अधिकाऱ्यांना मन:स्ताप…

पुणे – रेमडेसिविर विषयीच्या “फेक’ मेसेजमुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकाऱ्याला शुक्रवारी प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागले.

रेमडिसिविर इंजेक्‍शनसाठी करोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. जेथून मिळेल तेथून हे इंजेक्‍शन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून इंजेक्‍शनचा काळाबाजार, साठेबाजी, अवैध विक्री असे अनेक शब्द ऐकू येत असून, यातून पोलीसांनी काही जणांना अटकही केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या इंजेक्‍शनविषयी बरेच घोळ सुरू आहेत. ते कमी की काय, म्हणून काही लोकांनी मेसेजेसद्वारे अफवा पसरवण्याला सुरूवात केली आहे. अशाच मेसेजचा महापालिकेतील एका अधिकाऱ्याला शुक्रवारी प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे.

विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधींच्या नावाने हा मेसेज प्रभागांमध्ये, शहरात व्हायरल झाला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यावे हे समजले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना या संदर्भात खुलासा केला आणि असा मेसेज तुमच्या नावावर पसरल्याचे सांगितले. नागरिकांचा गैरसमज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दूर करण्याविषयी विनंती केली.

काय होते मेसेजमध्ये….
शहरी गरीब योजना कार्डधारक आणि पुणे महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना बाधितांना मोफत रेमडेसिविर इंजेक्‍शन महापालिकेतील एका अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने मिळणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत, असे सांगून त्या मेसेजमध्ये कागदपत्रांची यादी दिली आहे. हा मेसेज इतक्‍या वेगाने व्हायरल झाला की, काही तासांत संबंधित अधिकाऱ्याला हजारभर कॉल आले. त्यांना “हा मेसेज फेक आहे’ हे सांगताना त्यांच्या नाकीनऊ आले. एवढेच नव्हे तर काही जणांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. काही नागरिकांनी तर त्यांच्या कार्यालयाबाहेर कागदपत्रे घेऊन गर्दी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.