चंदीगढ – पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच भारतीय व्यावसायिक रेसलर दलिपसिंग राणा उर्फ ‘खली’ने भाजपात प्रवेश केला आहे. खलीच्या पक्षप्रवेशाने भाजपची पंजाबमध्ये ताकद वाढली आहे. रेसलर्सला फाईटच्या आखाड्यात विरोधकांना चितपट करणारा खली आता राजकीय आखाड्यात भाजपाकडून प्रचार करताना विरोधी उमेदवाराला निवडणुकीत चितपट करण्यासाठी सज्ज झाला आहे.
“मी भाजपामध्ये प्रवेश घेतला याचा मला आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेल्या कामामुळे ते योग्य पंतप्रधान ठरतात असे मला वाटते. त्यामुळे मी विचार केला की आपण देशाच्या विकासातील त्यांच्या कामाचा हिस्सा बनले पाहिजे. भाजपाच्या राष्ट्रीय धोरणांमुळे प्रभावित झाल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया खलीने दिली आहे.
दरम्यान, 2000 साली खलीने त्याच्या रेसलिंग करिअरला सुरुवात केली होती. याआधी तो पंजाब पोलिसात अधिकारी पदावर कार्यरत होता. त्यानंतर डब्लूडब्लूई मध्ये येऊन त्याने अनेकवेळा विजय मिळवला. खलीने हॉलिवुडमध्ये चार चित्रपटांमध्ये तर बॉलिवुडमध्ये दोन चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. 2021 मध्ये खलीचा डब्लूडब्लूई हॉल ऑफ फेमध्ये समावेश करण्यात आला आहे.