इतर कोणत्याही कामांसाठी वापरता येणार नाही : शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनासाठी दिले जाते अनुदान
पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 20 कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे. हे अनुदान इतर कोणत्याही कामांसाठी वापरता येणार नाही.
चालू आर्थिक वर्षातील खर्च भागविण्यासाठी शासनाने अर्थसंकल्प तयार करून तरतूदी केलेल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाच्या मागणीनुसार टप्या टप्प्याने ही तरतूद उपलब्ध करून देण्यात येत असते. वित्त विभागाने मंजूर केलेले अनुदान आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे अटी व शर्तीही लागू करण्यात आलेल्या आहेत. ज्या उद्दिष्टासाठी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे त्यासाठीच खर्च भागविण्यात यावा.
इतर लेखाशीर्षाकडे अनुदान वळती करता येणार नाही. मासिक निधी त्यात्या वेळीच खर्च करावा लागणार आहे. महिन्याअखेरीस अखर्चित रक्कम पुढील महिन्यात ओढण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. खर्चाचा मासिक प्रगती अहवाल दरमहिन्याच्या 7 तारखेपर्यंत सादर करण्याचे बंधनही घालण्यात आलेले आहे.
4 कोटी 36 लाख 12 हजार रुपयांचे अनुदानही नुकतेच वितरित करण्यात आले आहे. विविध शासकीय, प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहायक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वीच्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त करावी करावीत. पूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये.
वेतन बॅंक खात्यावर जमा करणे बंधनकारक
शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर प्रदान करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरीत्या व ऑफलाइन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नयेत, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील प्रभारी शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना दिल्या आहेत.