वॉशिंग्टन – गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची गुगलची पेरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट या कंपनीच्याही सीईओपदी निवड झाली आहे.ते गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांचे प्रमुख म्हणून काम पहाणार असल्याने ते आता जगातील एक अत्यंत शक्तिशाली कार्पोरेट अधिकारी बनले आहेत.
अल्फाबेट ही गुगलची मुख्य संस्था आहे. या संस्थेचे सीईओ लॅरी पेज, आणि अध्यक्ष सर्जी ब्रिन या दोघांनीही मंगळवारी आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यामुळे त्यांचा सारा कारभार पिचाई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 47 वर्षीय पिचाई हे गेली अनेक वर्षे गुगल मध्ये कार्यरत आहेत.
अल्फाबेट या कंपनीने गुगल सह अन्यही अनेक उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. आणि त्यांनी आपल्या उपकंपन्यांनाच नंतर स्वतंत्र कंपनी म्हणूनही मान्यता दिली आहे. आता कंपनीच्या कामकाज पद्धतीत आधिक सुलभता आणण्यासाठी अधिकारपदांची ही फेररचना केली जात आहे असे अल्फाबेट या कंपनीने म्हटले आहे. अल्फाबेट आणि गुगल या एकाच संस्थेच्या दोन शाखा असल्याने या दोन कंपन्यांना दोन स्वतंत्र सीईओंची गरज नाही त्यामुळे आता पिचाई यांच्याकडेच अल्फाबेटचाही कार्यभार राहील असे कंपनीच्यावतीने नमूद करण्यात आले आहे. मावळते अध्यक्ष आणि सीईओ हे अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कायम राहणार आहेत.