लखनौ – पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी (Pakistan’s slogans) केल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी (police) दोन महिलांसह चार जणांना अटक केली आहे. राज्याच्या बस्ती जिल्ह्यात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार एका हिंदू समुदायाच्या कार्यक्रमात एक पंधरा वर्षांची मुलगी अचानक व्यासपीठावर आली आणि तिने पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली.
ती अल्पवयीन असल्यामुळे तिला अटक करण्यात आली नाही, तथापि, या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंदू समुदायाचा जागरणाचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला. गावाच्या सरपंचांनी याबाबत तक्रार दिली आहे.
एका कटाचा भाग म्हणून ही घोषणाबाजी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले असून मुलीचे कुटुंबीय आणि तिच्या शेजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्गा पुजा समितीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी शेजारच्या गावातील मुलगी अचानक तेथे दाखल झाली आणि तिने घोषणाबाजी सुरू केली. तिचे माता- पिता आणि भाऊ व बहिणीला (parents) ताब्यात घेण्यात आले आहे.