पिंपरी – गुंतवणूक योजनांमध्ये मिळणारा जादा व्याजदर आणि करबचतीसाठी होणारा फायदा यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोस्टाच्या गुंतवणूक योजनांकडे कल वाढला आहे. त्यातही इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन व्यवहार करणे सुकर झाले आहे. त्यामुळे विविध बचत योजनांना विशेष प्रतिसाद मिळत आहे.
धंदा-व्यवसाय आदींमध्ये लागणारी गुंतवणूक, भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून बचत करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. त्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून पोस्ट, राष्ट्रीयीकृत बॅंकेतील गुंतवणुकीकडे पाहिले जाते. सोने, स्थावर मालमत्ता, शेअर, मॅच्युअल फंड, विमा योजना आदी पर्यायांचा देखील गुंतवणुकीसाठी विचार केला जातो. विविध योजनांसाठी दिला जाणारा जादा व्याजदर तसेच करबचत योजनांमुळे वाचणारा कर आदींमुळे सध्या पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढला आहे.
पोस्टाकडून 2019 मध्ये सुरू केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन व्यवहार करणे शक्य झाले आहे. या योजनेत “झिरो बॅलन्स’वर देखील खाते उघडता येते. तसेच, ग्राहकांच्या मागणीनुसार पैसे देण्याची घरपोच सुविधाही उपलब्ध आहे. त्याशिवाय, पोस्टातून बॅंकेत आणि बॅंकेतून पोस्टात पैसे हस्तांतर करता येतात. योजनेतील बचत खात्यासाठी 4 टक्के इतके व्याज मिळते. पोस्ट कार्यालयांमध्ये दरमहा सरासरी 300 खाते या योजनेत सुरू होत आहेत. चिंचवड स्टेशन येथील पोस्ट कार्यालयामध्ये योजनेत गेल्या वर्षभरात पाच ते सहा खाती सुरू झाली आहेत.
विविध योजनांना पसंती
पोस्टाकडून राबविण्यात येणारी आवर्ती ठेव योजना, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिंचवड स्टेशन येथील पोस्ट कार्यालयात आवर्ती ठेव योजनेत सध्या दररोज 20, मासिक उत्पन्न योजनेत दररोज 10 तर, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत दररोज सरासरी 8 खाती सुरू होत आहेत. तसेच मुलींसाठी सुकन्या योजना, मुदत ठेव योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, करबचतीसाठी राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र आदींमध्ये देखील गुंतवणूक करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत, अशी माहिती कांबळे यांनी दिली.