वाघोली (पुणे) – येथील गटनंबर 1123 पैकी 40 आर, गट नंबर 1362 पैकी 40 आर, गट नंबर 1419 पैकी 80 आर जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या तर्फे ग्रामपंचायत वाघोली यांना हस्तांतरित करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या जागा ग्रामपंचायतीकडे लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली.
सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षापासून वाघोली ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पास जागा मिळवण्यासाठी पंचायत समिती हवेली, जिल्हा परिषद पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. ग्रामस्थांनी ग्रामसभेत तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने मासिक सभेत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी (दि. 1) जानेवारी रोजी याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे ग्रामपंचायतीकडे जागा हस्तांतरित करण्याबाबतचा अहवाल पाठवला आहे. या जागा लवकरच ग्रामपंचायतीच्या ताब्यात येणार आहेत. वाघोलीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पीएमआरडीएने आठ कोटी रुपयांचे टेंडरदेखील काढले आहे. परंतु जागेअभावी काम थांबले होते. सरपंच वसुंधरा उबाळे व त्यांच्या कार्यकारी मंडळाने या कामी पाठपुरावा केला होता. याशिवाय सीएसआर फंडामधून जवळपास पाच कोटी रुपये निधी वाघोली ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने वाघोलीचा कचरा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. पालकमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ, ग्रामस्थ, सेवाभावी संस्था यांनी पाठपुरावाकामी मोलाची मदत केली असल्याचेही सरपंच उबाळे यांनी यावेळी सांगितले.
- कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश….
वाघोलीचा कचरा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून रेंगाळला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा देखील केला होता. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जवळपास 13 कोटी रुपयांचा निधी तर कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी तीन ठिकाणच्या जागा शासनाकडून मिळवण्यास ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे. त्यामुळे सरपंच वसुंधरा उबाळे, आजी माजी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाचे नागरिकांनी अभिनंदन केले आहे.