लस उपलब्ध, परंतु पुरेशी केंद्रेच नसल्याने उद्दिष्टपूर्तीबाबत साशंकता
पुणे – शहरात उद्यापासून (गुरुवार) महत्त्वपूर्ण अशा चौथ्या टप्प्याच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात शहरामध्ये 45 वर्षापुढील सुमारे दहा लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे. पालिकेला बुधवारी लसींचे डोस मिळाले; परंतु पुरेशी केंद्रे नसल्याने पहिल्या दिवशी लसीकरणाची स्थितीविषयी साशंकता आहे.
या आधी हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स, कोमॉर्बिड आणि 60 वर्षे वयापुढील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये सुमारे पाच ते सहा लाख नागरिकांचा समावेश होता. मात्र आता चौथ्या टप्प्याची सुरुवात म्हणजे जवळपास “ओपन टू ऑल’ च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
आधीची संख्या तुलनेने “लिमिटेड’ असल्याने सुमारे 100 केंद्रे पुरेशी होती. मात्र, आता लसीकरणाच्या व्यापक टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे.
पालिकेने यासाठी 325 लसीकरण केंद्रांची तयारी केली. मात्र, सध्या सुरू असलेल्या खासगी आणि महापालिका मिळून, 109 केंद्रांव्यतिरिक्त अन्य केंद्र गुरुवारी सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. लागणारे मनुष्यबळ, लस टोचक, डॉक्टर्स, नर्स, जागा, कॉम्प्युटर्स, ऑपरेटर्स या सगळ्या गोष्टींची तयारी बुधवारी सायंकाळपर्यंत झाली नव्हती.
“कोविन ऍप’ रजिस्ट्रेशन अर्जात होणार बदल
लसीसाठी लाभार्थ्याला त्याचे कोविन ऍपमध्ये रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. चौथ्या टप्प्यामध्ये 45 वर्षे वयापुढील नागरिकांचा समावेश असल्याने तसा “ऑप्शन’ अर्जामध्ये नमूद करावा लागेल. त्यासाठी कोविन ऍपमधील अर्जात बदल करण्यात येणार आहे. आधीपर्यंत 45 वर्षे वयापुढील सव्याधीग्रस्त असल्याचे नमूद करावे लागत होते. आता ते काढून टाकून, सरसकट 45 वर्षे वयापुढील असे केले जाणार आहे.
महापालिकेला मिळाले 1 लाख 40 हजार डोस
चौथ्या टप्प्यासाठी महापालिकेला 1 लाख 40 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. मंगळवारपर्यंत महापालिकेकडे केवळ सात हजारच डोस शिल्लक होते. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावतो की काय अशी स्थिती होती. याशिवाय एक तारखेपासून चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार होती. अशा पार्श्वभूमीवर लस तुटवडा चिंता निर्माण करणारा होता. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला 1 लाख 40 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. रोज 50 हजार जणांचे लसीकरण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.