सरन्यायाधिश बोबडेंनी स्वीकारली सूत्रे; राष्ट्रपतींकडून घेतली शपथ

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधिश म्हणून न्या. शरद बोबडे यांनी आज सूत्रे स्वीकारली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाचे ते 47 वे सरन्यायाधिश ठरले आहेत. त्यांनी ईश्‍वराला स्मरून इंग्रजीतून शपथ घेतली. सरन्यायाधिश म्हणून त्यांना 17 महिन्यांचा कालावधी मिळणार असून त्यांच्या निवृत्तीची तारीख 23 एप्रिल 2021 अशी आहे.

या शपथविधी समारंभासाठी त्यांच्या मातोश्रीही दरबार हॉल मध्ये उपस्थित होत्या. त्या आजारी आहेत. त्यामुळे त्यांना तेथे स्ट्रेचरवर आणण्यात आले होते. शपथविधीनंतर त्यांनी आपल्या मातोश्रींचे चरणस्पर्श करीत त्यांचे आर्शिवाद घेतले. शपथविधी समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, यांच्या सह अनेक केंद्रीय मंत्री व विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक राज्यांचे मुख्य न्यायाधिशही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सेवा ज्येष्ठतेनुसार न्या बोबडे यांची सरन्यायाधिशपदी नियुक्ती झाली आहे. मावळते सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी त्यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली होती. ती केंद्र सरकारने मान्य केली. मुळचे महाराष्ट्राचे असलेले बोबडे यांचे वडिल अरविंद श्रीनिवास बोबडे हेही ख्यातनाम वकिल होते. बोबडे यांच्या पुढे सध्या देशभरातील न्यायालयांमध्ये प्रलंबीत असलेल्या खटल्यांचे आव्हान आहे. प्रलंबीत प्रकरणांची संख्या काही कोटींमध्ये आहे. अनेक न्यायालयांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर न्यायाधिशांची रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे प्रलंबीत खटल्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या प्रकरणाला प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न राहील असे न्या बोबडे यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)