जेएनयु सुरळीत चालवण्यासाठी समिती स्थापन

नवी दिल्ली: कायम आंदोलने आणि वादामुळे चर्चेत असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा कारभार सुरळीत चालू राहावा यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. जेएनयुतील विद्यार्थ्यांनी तेथे सध्या वसतीगृहातील दरवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. याच संबंधात त्यांनी संसदेवर निषेध मोर्चाही आयोजित केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनुष्यबळ विकास खात्याचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले की या विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा आणि तेथील प्रश्‍नावर चर्चेतून मार्ग काढला जावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तेथील काही जटील प्रश्‍नावर काय तोडगा काढावा यावर शिफारस करण्यासाठी तीन जणांची एक समितीही स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे ते म्हणाले. या समितीचे सदस्य विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. या समितीला युजीसीचीही मदत लाभणार आहे.

विद्यार्थी वसतीगृहात प्रशासनाने मोठीच दरवाढ केली आहे. आंदोलनानंतर ही दरवाढ काही प्रमाणात मागे घेण्यात आली असली तरी ती केवळ दारिद्य्र रेषखालील विद्यार्थ्यांनाच लागू राहणार आहे. तसेच ज्यांना शिष्यवृत्ती मिळते अशांनाही ती लागू राहणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांमधील असंतोष आणखी उफाळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.