वन विभागाकडून दोन लाख कुटुंबांना रोजगार

“वनअमृत’ ब्रॅंड विकसित; पश्‍चिम घाट वनक्षेत्रातील 1100 गावांना फायदा
सणबूर (वार्ताहर) – शासकीय वनातून मिळणाऱ्या फळ संपदेवर प्रक्रिया करून जंगला सभोवताली असलेल्या गावातील कुटुंबांना रोजगार मिळावा, या उद्‌देशाने “वनअमृत’ ही संकल्पना राबविली जात आहे. पश्‍चिम घाटातील 1100 गावातील दोन लाख कुटुंबाना रोजगार उपलब्ध करून देण्याचे विभागाचे उद्दिष्ट असल्याची माहिती उपजिविका तज्ञ डॉ. योगेश हांडे यांनी दिली.

कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक क्‍लेमेंट बेन, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर वनवृत्तात वनसंवर्धन व वन संरक्षणाच्या कार्याची माहिती देण्यासाठी कराड आणि पाटण तालुक्‍यातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेचे ढेबेवाडी येथील वन विभागाच्या विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटण – कराडचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्यासह क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. योगेश हांडे म्हणाले, जंगला मधील आवळा, हिरडा, बेहडा, फणस, जांभूळ, करवंद, तमालपत्र, कडीपत्ता, आदीवर प्रक्रिया करून “वनअमृत’ या ब्रॅंडवर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर 40 गावामध्ये लोकसहभागातून ही उत्पादने चालू आहेत. भविष्यात राज्यातील पश्‍चिम घाटातील सातारा सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी वगैरे जिल्ह्यातील 1100 गावातील दोन लाख कुटुंबांना 16 प्रोसेसिंग युनिट उभारून शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले आहे, अशी माहिती योगेश हांडे यांनी दिली. यावेळी मानव आणि वन्यजीव यातील संघर्ष हाताळण्याचे प्रशिक्षण डॉ. समीर वाळवेकर यांनी दिले. तसेच वन कर्मचाऱ्यांना फिरती गस्त घालताना वापरण्यासाठी दिलेल्या साहित्याची हाताळणी कशी केली पाहिजे, विषयीची माहिती राहूल काळे यांनी दिली.

वन विभागाच्यावतीने वनअमृत ही संकल्पना राबविली जात आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून 1100 गावातील 2 लाख कुटुंबांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेचा वनक्षेत्र व लगतच्या क्षेत्रातील नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच वनसंपदा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
विलास काळे ,वनक्षेतपाल

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.