पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे-हैदराबाद विमानाला तीन तास उशीर झाला. बुधवारी (दि. २४) रात्री हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळावर ताटकळत थांबावे लागल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. विमानाला उशीर का झाला, हे विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले नाही.
पुणे विमानतळावरून हैदराबादला रात्री १०:३०च्या सुमारास विमान उड्डाण करणार होते. मात्र, हैदराबादला जाणारे विमान येण्यास उशीर झाला. प्रवाशांना फक्त विमानाला उशीर होणार असल्याचे सांगितले. पण, पुढे वेळ वाढत गेली.
त्यामुळे प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तीन तासांनी हैदराबादसाठी विमान रवाना झाले. विमानाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
सोशल मीडीयावर प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. सुट्टयाचा हंगाम सुरू असून नागरिकांकडून गावी व पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यात विमानाला उशीर झाल्यानंतर त्यांचे नियोजन बिघडत आहे.