शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा एकूण निकाल 20.59 टक्‍के लागला आहे. इयत्ता पाचवीचा 22.04 टक्‍के तर इयत्ता आठवीचा 18.49 टक्‍के एवढा निकाल लागला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक, प्रमाणपत्राच्या छापील प्रती 26 जुलैपर्यंत संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पोच करण्यात येणार आहेत. यात राज्य गुणवत्ता यादीतील शहरी, ग्रामीण, सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रेही समाविष्ट असणार आहेत. गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या मार्फतही गुणपत्रक, प्रमाणपत्र 1 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर शाळांनी ती विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे.

52 अनधिकृत शाळांचे निकाल राखून ठेवले
शिष्यवृत्ती परीक्षेचे विलंब शुल्क न भरलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या एकूण 32 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. अनधिकृत शाळा व वर्गांमधीलही विद्यार्थी परीक्षेला बसविण्यात आले होते. त्यामुळे 52 अनधिकृत शाळातील विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्याची कारवाई करण्यात आली आहे. यात इयत्ता पाचवीचा 29 तर आठवीच्या 23 शाळांचा समावेश आहे.

पुणे विभागात पुण्याची बाजी
पुणे विभागाचा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा एकूण निकाल 25.17 टक्‍के लागला आहे. यात पुणे जिल्ह्याचा 27.97 टक्‍के, अहमदनगरचा 21.39 टक्‍के, सोलापूरचा 23.85 टक्‍के निकाल लागला आहे. इयत्ता आठवीच्या परीक्षेचा एकूण निकाल 24.04 टक्‍के लागला आहे. यात पुण्याचा 27.91 टक्‍के, अहमदनगरचा 19.98 टक्‍के, सोलापूरचा 21.27 टक्‍के एवढा निकाल लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.