- 81.76 टक्के मतदान : 49 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 316 जागांसाठी लढत
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींमधील 316 जागांसाठी 711 उमेदवारांमध्ये लढत झाली. तालुक्यातील 150 मतदान केंद्रावर 81.76 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान बऊर ग्रामपंचायत 93.34 टक्के, तर सर्वात कमी 55.93 टक्के माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये झाले आहे. एकूण 1167 अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती होते.
सोमवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, संतोष सोनवणे यांनी दिली.
मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 150 मतदान केंद्रावर मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झाले. या 316 जागेसाठी 711 उमेदवारांना मतदान झाले. 82 हजार 519 एकूण मतदारांपैकी 67 हजार 464 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 42 हजार 732 पैकी 35 हजार 413, तर स्त्री 39 हजार 786 पैकी 32 हजार 051 मतदारांनी मतदान केले.
या मतदान प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी 7, निवडणूक निर्णय अधिकारी 35, नियंत्रण कक्ष 35, तलाठी व ग्रामसेवक 90, केंद्राध्यक्ष 1 मतदान अधिकारी 3, शिपाई 1 व पोलीस कर्मचारी 1 असे एकूण 6 असे 900 असे एकूण 1 हजार 167 अधिकारी व कर्मचारी नियुक्ती होते. 26 बस व 35 छोटी वाहने एकूण 61 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये मतदान यंत्र व साहित्य जमा करण्यात आले.
पवनमावळात मतदानाचा टक्का वाढला
पवनानगर – पवनमावळात सकाळपासून अतिशय उत्साहात मतदान सुरू आहे. दुपारी अडीच वाजेपर्यंत 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली. महागाव, कोथुर्णे, तिकोणा, वारू, शिवणे, येळसे, मळवंडी ठुले बऊर, थुगाव, अजिवली, शिवली, मोरवे या 12 ग्रामपंचायतीत 75 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. तर पवनमावळातील आंबेगाव, येलघोल या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही भावकी गावकीच्या जोरावर लढली जाते, त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची व प्रतिष्ठेची मानली जाते, त्यामुळे गावातील अधिकाधिक मतदान कसे होईल, त्यासाठी सगळेच प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत निवडणुकीत सगळीकडे मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू राहावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खडकाळा-खामशेत ग्रुप ग्रामपंचायतसाठी
71.27 टक्के मतदान
कामशेत – खडकाळा-खामशेत ग्रुप ग्रामपंचतीच्या निवडणुकीसाठी 71.27 टक्के मतदान झाले आहे. खडकाळा-खामशेत निवडणुकीस मतदान करण्यासाठी खडकाळामध्ये 4 ठिकाणी 13 बूथ उभारण्यात आले होते. नागरिकांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. दुपारी दीडवाजेपर्यंत सरासरी 50 टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजाविला. कामशेत ही संवेदनशील ग्रामपंचायत असल्याने याठिकाणी पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आल्याने यावेळी येथील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. येथील 4 हजार 809 पुरुष मतदारांपैकी 3 हजार 512 पुरुष मतदारांनी मतदान केले आहे. 4 हजार 569 महिला मतदारांपैकी 3 हजार 172 महिला मतदारांनी मतदान केले आहे, असे एकूण 9 हजार 378 मतदारांपैकी 6 हजार 684 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांची “व्हीलचेअर’ची व्यवस्था न केल्याने दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांची गैरसोय झालेली पाहायला मिळाले.