पुणे, {प्रभात वृत्तसेवा}: पुणे विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता येथील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेस यश आले असून गणेशखिंड रस्ता आणि सेनापती बापट रोड यांच्या जंक्शनवर असणारी “एमएसईडीसीएल’ची इमारत बुधवारी पहाटे महापालिकेने जमीनदोस्त केली. त्यामुळे सुमारे साडेसहा गुंठे जागा रस्त्यासाठी मिळाली आहे. गणेशखिंड रस्त्याकडून सेनापती बापट रस्त्याकडे वळणाऱ्या वाहनांना स्वतंत्र रस्ता मिळणार आहे.
विद्यापीठ चौकात उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. तर, हा रस्ता सिमला आॅफिस चौकापर्यंत तो ४५ मीटर रूंद करण्यात येत आहे. मात्र, भूसंपादनात अडथळे येत असल्याने पलाचे काम सुरू असतानाच कोंडी होत आहे. ती फोडण्यासाठी वीज मंडळाच्या जागेची मागणी शासनाकडे करण्यात येत होती. अखेर त्याला यश आले असून ही इमारत ताब्यात घेण्यात आली.
त्यानंतर मध्यरात्री सदरची इमारत जॉ-कटरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. पथ विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, कार्यकारी अभियंता दिलीप पावरा, उप अभियंता मनोज गाठे आणि कनिष्ठ अभियंता नलावडे यांच्यासह पथ विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते.
अशी फुटणार कोंडी
आचार्य आनंद ऋषीजी चौकात पीएमआरडीएककडून उड्डाणपूल उभारला जात आहे. या कामामुळे चौकात वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे हा रस्ता ४५ मीटर रूंद करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी टप्प्याटप्प्याने जागा मिळत आहे. तेथे गणेशखिंड रस्ता सेनापती बापट रस्त्याला जोडला जातो. तर विद्यापीठ चौकातून येणारी वाहने येथूनच पुढे सेनापती बापट रस्त्याकडे जातात.
तेथे वाहने समोरासमोर येऊन कोंडी होते. मात्र, आता शिवाजीनगरकडून आलेल्या आणि सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना अलिकडूनच स्वतंत्र रस्ता मिळेल. परिणामी, या वाहनांना थांबावे लागणार नाही. तसेच विद्यापीठ रस्त्याकडून आलेली वाहनेही सरळ जाऊ शकतील. ती एकमेकांच्या समोर येणार नाही. त्यामुळे वाहतुकीचा वेगही वाढणार आहे.