डॉ. साळवे यांच्याकडून भ्रष्टाचाराचा कळस
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोविडकाळात झालेल्या भ्रष्टाचारामध्ये आरोग्य नव्हे वैद्यकीय विभागच भ्रष्टाचारी असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये कोविड सेंटरला कोट्यवधी रूपये देण्यात वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांच्याच टिप्पण्या कारणीभूत असल्याचे आरोप ऍड. अतुल कांबळे यांनी केला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून कोविड कालावधीमध्ये तब्बल दीडशे कोटींहून अधिक कामे नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी केल्याची दवंडी वैद्यकीय विभाग, सत्ताधारी भाजप पिटत असले, तरी वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे.
डॉ. पवन साळवे त्यांचे सहकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चा गैरफायदा घेत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याशी संगनमत करून महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला असल्याचे ऍड. कांबळे यांनी म्हटले आहे.
अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, टेंडर लिपीक रमेश भगत या तिघांनी मिळून ठेकेदारांशी संगनमत करून पालिकेच्या तिजोरीची लूट केली आहे. ही लूट नागरिकांच्या कर रूपातून जमा झालेल्या पैशांची झाली असून तिघांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ऍड. कांबळे यांनी केली आहे.