इंदापूर – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मागील पंधरा दिवसांपासून भाजपमधील बड्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खेचून आणण्यासाठी व 3 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तालुक्यात मोठी मेगा भरती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यासाठी यशस्वी फिल्डिंग लावली आहे.
यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई शेंडे, बापुराव शेंडे तर आता नव्याने भाजपचे युवक नेते दीपक जाधव यांना स्वतःच्या गाडीत घेऊन शहरातील विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे राज्यमंत्री भरणे
यांनी फोडाफोडीच्या राजकारणात चौकार मारला आहे. दीपक जाधव यांची इंदापूर तालुक्यातील युवक वर्गाशी अत्यंत जवळीक असल्यामुळे व युवकांचे संघटन मजबूत असल्यामुळे गावपातळीवरील निवडणुका व तालुका पातळीवरील निवडणुका यामध्ये अधिकचे
मताधिक्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पारड्यात पडत होते. यापूर्वी दीपक जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी झाली होती म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यावेळी दीपक जाधव यांना आपल्या तंबूत खेचून घेतले;
मात्र बारामतीतील पवार कुटुंबीयांशी तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी दीपक जाधव यांचे कायमचे सलोख्याचे संबंध राहिल्यामुळे दीपक जाधव पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल होणार आहेत.