पुणे- अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 22 वर्षीय तरूणाला सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी जामीन मंजुर केला आहे. पीडितेचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे 164 नुसार जबाब नोंदविण्यात आलेला आहे. त्यामध्ये आणि त्यापूर्वी तिने पोलिसांकडे दिलेल्या जबाबामध्ये ती स्वत:च्या इच्छेनुसार आरोपीसोबत पळून गेली आहे.
तिच्या परवानगीनेच शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ऍड. राहुल नायर यांनी केली. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने सुनील पाटील वि. महाराष्ट्र शासनाच्या केसमध्ये 15 वर्षाची अल्पवयीन पीडित असताना जामीन दिल्याचा निवाड्याचा दाखला दिला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
सौरभ सोमनाथ यादव (वय 22 रा. बिजवडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने ऍड. राहुल नायर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. याबाबत पीडित साडेसोळा वर्षीय मुलीच्या आईने सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.
अल्पवयीन पीडितेला यादव याने पालकांच्या कायदेशीर रखवालीतून जून 2121 मध्ये पळवून नेले. मांजरी बुद्रुक आणि हडपसर भागात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटेल आहे. या प्रकरणात यादव याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला होता.