येरवडा, दि. 21 (प्रतिनिधी) -लक्ष्मीनगर येथील ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदलेला खड्डा ठेकेदाराने दुरुस्त न करता तसाच ठेवला होता.त्याची दुरुस्ती पालिकेने व त्या ठेकेदाराने न केल्याने अनेकांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वखर्चातून रस्ता दुरुस्ती करुन नागरिकांची या त्रासातून सुटका केली.
येरवडा येथील संतोष मित्र मंडळ ते उमाजी मित्र मंडळपर्यंतचा रस्ता ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदलेला होता. मात्र ड्रेनेज लाइन टाकल्यानंतर खोदलेला रस्ता संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केला नव्हता. त्यामुळे पादचाऱ्यांना अडचणी येत होत्या. पावसाळा असल्याने रस्ता निसरडा झाला होता. यामुळे अनेक दुचाकीचालक धडपडले होते. स्थानिक नागरिकांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार कळविले होते. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे शहराध्यक्ष अन्वर पठाण यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून ही रस्ते दुरुस्ती केली. या कामासाठी रमेश गव्हाणे, विकास सोनवणे, कदीर शेख, फैयाज शेख, जिलानी शेख व स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.
ड्रेनेज लाइनसाठी हा रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, अर्धवट लाइन टाकून रस्ता न बुजवता तसाच ठेवला होता.खड्ड्यामुळे अनेकजण यात पडत होते. अनेकांना किरकोळ मारही लागला. आता आमचा हा त्रास थांबणार आहे.
– सुनील औटी, स्थानिक नागरिक