सिंहगडरस्ता, दि. 21 (प्रतिनिधी) -धायरी परिसरात सध्या अस्वच्छतेच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे नियमित स्वच्छता करावी. पालिका प्रशासनाने सुविधा पुरवाव्यात आदी विषयांवर माजी नगरसेवक बाळासाहेब नवले यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त आशा राऊत यांनी या परिसराची पाहणी केली.
धायरी परिसरात जागोजागी कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे चिखल आणि अस्वच्छता पसरली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक बाळासाहेब नवले यांनी आमदार तापकीर यांच्याकडे हा विषय मांडला. त्यावर आमदार तापकीर यांनीही पालिका अधिकाऱ्यांसह बैठक घेत अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. यानंतर उपायुक्त राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणी करत धायरी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, भाजयुमो संघटन सरचिटणीस सारंग नवले, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संतोष भाईक, आशीष सुपणार, आरोग्य निरीक्षक अजय गजधाने, कुणाल मते, मारुती हनमघर, रुपेश मते, राकेश जोरी उपस्थित होते.