वॉशिंग्टन: करोनावरील लसीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या खासगी औषधी कंपनीने केला आहे. या दाव्यानंतर मॉडर्ना कंपनीचे शेअर्स 39 टक्क्यांनी वधारले आहेत. तर, वर्षभरात मॉडर्ना कंपनीच्या शेअर्समध्ये 240 टक्क्यांची वाढ दिसली.
मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या आठ निरोगी स्वयंसेवकांना प्रत्येकाला दोन डोस दिले आणि पहिल्या दोन निरोगी स्वयंसेवकांच्या निकालावर आधारित हे सकारात्मक निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच फेरीमध्ये जितक्या व्यक्तींना मॉडर्ना कंपनीने बनवलेली लस दिली गेली, तितक्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या.
या अँटीबॉडीजचा प्रयोगशाळेत विषाणूंवर काय परिणाम होतो, याचे निरीक्षण केले गेले. या अँटीबॉडीजनी विषाणूंची वाढ रोखली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यानंतर जे रुग्ण आता पुर्ण बरे झाले आहेत, त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज आणि कंपनीने तयार केलेल्या औषधाचा डोस घेतलेल्या स्वयंसेवकांच्या शरीरातील अँटीबॉडीजची तुलना केली असता, दोन्हीमध्ये बरेच साधर्म्य आढळून आले आहे.
करोनाच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात असून उर्वरित टप्पेही यशस्वी झाल्यास पुढील जानेवारीपर्यंत ही लस बाजारात आणली जाईल. त्यासाठी लसीचा निर्मितीचा वेग वाढवला जाईल, असा दावाही मॉडर्ना कंपनीने केला आहे.