अग्रलेख : करोनाच्या नव्या विषाणूचे आव्हान!

ब्रिटन आणि इटलीत करोना विषाणूचा नवीन अवतार उद्‌भवला आहे. हा विषाणू म्हणे मूळ करोना विषाणूपेक्षा 70 टक्‍के अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे साऱ्या युरोपात पुन्हा घबराट उडाली असून ऐन ख्रिसमस काळात ब्रिटन आणि इटलीत पुन्हा लॉकडाऊनसदृश स्थिती उद्‌भवली आहे. युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी घालायला सुरुवात केली आहे. नेदरलॅंड, बेल्जियम, जर्मनी या देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

ब्रिटनमधील स्थिती कमालीची धोकादायक बनली असून ती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे, अशी जाहीर कबुली तिथल्या पंतप्रधानांनीच दिली आहे. त्यामुळे एकतृतीयांश ब्रिटन लॉकडाऊन खाली आणण्यात आला आहे. हा नवीन विषाणू करोना विषाणूचीच पुढील आवृत्ती आहे. जशी परिस्थिती बदलते तसे हे विषाणूसुद्धा आपली रचना बदलतात आणि ते स्वत:ला अधिक प्रसारयोग्य बनवतात. तसाच प्रकार ब्रिटनमध्ये आढळून येत असून करोनाच्या या नव्या स्वरूपातील विषाणूंनी ब्रिटनवासीयांना बऱ्यापैकी घेरले आहे. त्यामुळे युरोपातील देशांनी पटापट ब्रिटिश नागरिकांना आणि त्या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालायला सुरुवात केली आहे. या नवीन परिस्थितीची भारत सरकारलाही जाणीव असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या विधानावरून लक्षात आले आहे. पण त्यांनी त्या संबंधात केलेले विधानही पूर्वीच्याच विधानासारखे मोघम स्वरूपाचेच आहे. करोनाच्या येण्याच्या आधीच्या काळातही भारताला करोनाचा धोका उद्‌भवू शकत नाही, असे विधान त्यांनी केले होते. पण भारतात करोना आला आणि तो वेगाने सर्वत्र पसरला. आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची करोना रुग्णसंख्या भारतात आहे. या नवीन विषाणूविषयी डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे की, सरकार याबाबत सतर्क असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी असा तोंडी दिलासा देण्याने भारतावर या नव्या विषाणूंचे संकट येणार नाही, असे गृहीत धरून चालणार नाही. 

केंद्र सरकार या नवीन विषाणूंविषयी सतर्क आहे म्हणजे नेमकी सरकारने काय सतर्कता बाळगली आहे हे समजायला हवे. नुसतेच आम्ही सतर्क आहोत अशी राजकीय शैलीची भाषा वापरून नागरिकांना अंधारात ठेवून चालणार नाही. या आधी करोनाची साथ शेजारच्याच चीनमध्ये निर्माण झाली असतानाही विदेशातून येणाऱ्या विमानांना प्रतिबंध घालण्यात बेफिकिरी दाखवली गेली होती. विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना नीट तपासण्याची तसदीदेखील भारतीय विमानतळांवर घेतली गेली नव्हती, ही बाब एव्हाना जगजाहीर झाली आहे.

करोना ऐन भरात असतानाच अहमदाबादला “नमस्ते ट्रम्प’चा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यासाठी पाच हजार विदेशी नागरिकांची विनातपासणी उपस्थिती ठेवण्यात आली होती व पैज लावून एक कोटी नागरिक तेथे ट्रम्प यांच्या स्वागताला उपस्थित ठेवण्यात आले होते. या साऱ्या घटनांची पुन्हा आठवण येऊ लागली आहे. अशा स्वरूपाच्या बेफिकिरीतूनच भारतात करोना वेगाने पसरला होता. आता तो कसाबसा आटोक्‍यात आला असताना ही नवीन डोकेदुखी सुरू झाली आहे. त्याचा भारतात फैलाव रोखायचा असेल तर पहिल्या टप्प्यात युरोपीय देशांनी जी उपाययोजना सुरू केली आहे त्याचे तातडीने भारताने अनुकरण केले पाहिजे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परवाच्या फेसबुक भाषणात या नवीन आव्हानाचा सविस्तर उल्लेख करून नागरिकांना सतर्क केलेच आहे. त्यांनी पुन्हा मास्क आणि सॅनिटायझरचा आग्रह धरला आहेच. मुळात हा नवीन विषाणू भारतात येण्यापासून कसे रोखले जाईल, याकडे आता सर्वोच्च पातळीवरून लक्ष देणे गरजेचे असून त्या अनुषंगाने त्वरित उपाययोजनाही केली गेली पाहिजे. पुन्हा लॉकडाऊन कोणालाच परवडणार नाही, हे जरी खरे असले तरी नवीन विषाणूंचा प्रादुर्भाव पसरेपर्यंत आपण गाफील राहणार आहोत काय, हा प्रश्‍न पुन्हा नव्याने उपस्थित होतो आहे. आज सुदैवाने भारतातील करोना प्रसाराचा वेग पूर्ण आटोक्‍यात आला आहे. रोज आढळून येणारी रुग्णसंख्या आता 30 हजारांच्या आत आली आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दरही 95 टक्‍क्‍यांच्यावर गेला आहे. ही आकडेवारी दिलासाजनक असतानाच हे नवे आव्हान उभे राहणे धास्ती निर्माण करणारे आहे. लसीकरणाने ही समस्या आटोक्‍यात येईल काय, याचाही अंदाज लागेनासा झाला आहे.

आज ज्या लसींना अनुमती दिली गेली आहे त्या लसींमध्ये नवीन विषाणूंना अटकाव करण्याची क्षमता आहे काय, यावर अजून तज्ज्ञांचे भाष्य आलेले नाही. तेही लवकर येण्याची गरज आहे. नाही तर नव्या विषाणूसाठी नव्या लसीची गरज लागू शकते काय आणि ती विकसित होण्यास किती काळ लागणार असेही अनुषंगिक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित राहतात. त्या संबंधात नागरिकांचे शक्‍य तितक्‍या लवकर शंका निरसन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज डॉ. हर्ष वर्धन यांची नवीन करोना विषाणूबाबतची जी प्रतिक्रिया आली आहे, ती या नव्या आव्हानाच्या अनुषंगाने नाही तर केवळ केजरीवालांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना तातडीने बंदी घालावी या मागणीच्या अनुषंगाने आहे. हे केंद्रातील सत्ताधारी, विरोधी पक्षांच्या विधानांवर जितक्‍या तातडीने प्रतिक्रिया देऊन आपली तत्परता दाखवतात तितकी तत्परता त्यांनी देशापुढील अशा गंभीर आव्हानांच्या बाबतीतही दाखवणे गरजेचे आहे.

केजरीवालांच्या मागणीला उत्तर देताना त्यांनी पॅनिक होऊ नका, असे त्यांना सांगणे एवढ्यापुरतीच त्यांची ही प्रतिक्रिया मर्यादित होती, असे दिसते आहे. पण ब्रिटनहून येणारी विमाने भारत सरकार रोखणार आहे काय, यावर त्यांनी भाष्य केलेले नाही. या नव्या विषाणूच्या प्रसाराचा वेग मूळ करोना विषाणूपेक्षा 70 टक्‍के अधिक आहे, असे जे सांगितले गेले आहे ते अधिक धोकादायक आहे. तो विषाणू जर येथे प्रकटलाच तर त्याला अटकाव करायला जराही उसंत मिळण्याची शक्‍यता नाही. सध्या ब्रिटन आणि काही प्रमाणात इटलीपुरताच याचा प्रादुर्भाव मर्यादित असला तरी त्याच्या प्रसाराचा वेग लक्षात घेऊन या देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांच्या संबंधात तातडीने दक्षता घेणे हा सध्याचा महत्त्वाचा भाग आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.