नगर – लॉकडाऊनचे नियम अंशत: शिथिल झाल्याने जिल्ह्यात आगंतुकांची गर्दी वाढली आहे. त्यात शहरासह तालुक्यातील मुख्य बाजारपेठा ही हाऊसफुल्ल झाल्या. त्यात नागरिकही शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे नगरकरच करोनाला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. याच हलगर्जीपणामुळे आज पुन्हा सहा रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्यात करोनाबाधितांचा आलेख वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या 282 वर गेली आहे.
संगमनेर तालुक्यातील तीन, पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित सापडला आहे. संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज 59 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील 48 वर्षीय पुरुष आणि जोर्वे येथील 45 वर्षीय पुरुषालाही करोनाची बाधा झाली. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कामुळे त्यांनी ही बाधा झाली, तर मूळचा झारखंड येथील असलेला आणि नगर शहरातील सारसनगर येथे राहणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीलाही करोनाची लागण झाली आहे.
कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे प्रवास करून नगरला आला होता. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 282 वर गेली आहे. परराज्यातून, परजिल्ह्यातून येणारे नागरिक हे संस्थात्मक विलगीकरण कक्षात थांबण्याचे आदेश असतानाही अनेकजण या आदेशाची पायमल्ली करत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तसेच आज जिल्ह्यातील चार रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये संगमनेर येथील दोन, तर नगर शहरातील सारसनगर आणि बोल्हेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 237 झाली आहे.