गुऱ्हाळघरांसमोर समस्यांचे गुऱ्हाळ कायम

सुरेश डुबल
शेतकऱ्यांचा साखर कारखान्यांकडे ओढा; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
 
कराड – गेल्या आठ-दहा वर्षात राज्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असल्याने हळूहळू गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत गेली आहे. गुऱ्हाळघरे आता नावालाच उरली असून या गुऱ्हाळघरांना पूर्वीचे वैभव येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, साखर कारखानदारी वाचली पाहिजे म्हणून सरकारसमोर गाऱ्हाणे मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गुऱ्हाळ घरांसाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी गुऱ्हाळघर चालकांकडून होत आहे.

सध्या जी काही गुऱ्हाळघरे शिल्लक राहिली आहेत ती आता अखेरची घटका मोजत आहेत. गूळ निर्मितीचा उत्पादन खर्च व गुळाला मिळणाऱ्या दरात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर गुऱ्हाळघर मालकही तोट्यात जात आहेत. गुऱ्हाळघरातून तयार होणारा गूळ 30 किलो, 10 किलो, 5 किलो अशा भेलीच्या स्वरूपात तयार करण्यात येतो. मोठमोठ्या शहरात 1 किलो वजनाच्या भेली स्वरूपातील गूळ तयार करून त्याचे बॉक्‍स पॅकींग करण्यात येते.

गूळ तयार करण्यासाठी ऍसिड, गूळ पावडर, वाफा पावडर, भेंडी पावडर, साखर, एरंडेल तेल, बगॅस अशा विविध पदार्थांची गरज असते. या पदार्थांशिवाय गूळ तयार होत नाही. गूळ तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि त्याला मिळणारा दर यामध्ये तफावत असल्याने गुऱ्हाळघरांची संख्या वर्षानुवर्षे कमी होऊ लागली आहे.

गूळ तयार झाल्यानंतर तो विक्रीसाठी जिल्ह्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांच्या आडत्यांकडे येतो. तेथे या गुळाचा सौदा होऊन लागलेल्या दरावर आडत, तोलाई, मापाडी, हमाली आकारली जाते. या सर्व प्रक्रियेतून जाणाऱ्या गुळास विक्रीपर्यंत अनेक ठिकाणी खर्च येतो. त्यामुळे गुळाला प्रतिक्विंटल चांगला भाव मिळाला तरच ऊस शेती परवडते, असे शेतकरी व गुऱ्हाळघर मालकांचे म्हणणे आहे.
गूळ साठवणीबाबतीत अनेक त्रुटी असल्याचे दिसून येते. त्यासाठी अत्याधुनिक प्रतिची गोदामे नाहीत, ती उपलब्ध होण्याची गरज आहे.

या सर्व गोष्टींचा परिणाम गुऱ्हाळघरांवर झाला आहे. त्यातच गुऱ्हाळघरांवर काम करणाऱ्या गुळवे, मळवे, जाळवे, घाणेकरी, त्यांच्या हाताखाली असणारे मजूर व ऊसतोडणी कामगार संभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असून यापैकी एक घटकही नसला तर गूळ तयार करणे शक्‍य होत नाही. पूर्वी साखर कारखान्यांची संख्या कमी होती तेव्हा गुऱ्हाळघरांची संख्या आणि त्यांचे वैभव पाहण्यासारखे होते. काळाच्या ओघात साखर कारखान्यांची संख्या अनेकपटींनी वाढल्याने गुऱ्हाळघरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेलेली आज पहावयास मिळत आहे. या व्यवसायात मोठी गुंतवणूक करून तोटा सोसावा लागत असल्याने या व्यवसायाकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे.

मागील आठ-दहा वर्षांपूर्वी आम्ही ऊस गुऱ्हाळघराला घालत होतो.तेव्हा बाजारसमितीत गुळाला भावही चांगला मिळत होता. आता ऊस उत्पादन खर्च व मिळणारे पैसे याचा विचार केला तर आवश्‍यक एवढा नफा मिळत नाही. याउलट कारखान्यांना ऊस घातल्यास उशिराने का होईना एफआरपी नुसार ऊसाला दर मिळत आहे. त्यामुळे आता आम्ही गुराळ घराऐवजी कारखान्यांना ऊस घालतोय.

चंद्रकांत पाटील, शेतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.