नांदेड – कॉंग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले माजी केंद्रीय मंत्री नसीम खान यांच्या वाहनाला नांदेडमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर शनिवारी झाला.
नसीम खान हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडच्या दिशेने जात होते. या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झाल्याचे समजते. मात्र ही दुखापत किरकोळ असून, ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
7 नोव्हेंबर सोमवारी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्याच तयारीसाठी नसीम खान नांदेडच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. नसीम खान यांच्या कारला एका दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातात नसीम खान यांच्या गाडीचा चालक बऱ्यापैकी जखमी झाला आहे.
दरम्यान, नसीम खान हे नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे प्रभारी असून, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचे व्यवस्थापन हे एच. के. पाटील आणि अशोक चव्हाण करत असले तरी नांदेडची जबाबदारी नसीम खान यांच्यावर आहे.