नवी दिल्ली – ऑनलाइन मार्केटच्या झपाट्याने वाढणाऱ्या जगात, ठगांनीही फसवणुकीचे नवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका दुकानदाराने ऍमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक केली. हा दुकानदार ऍमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन कॉम्प्युटर मागवायचा आणि त्यानंतर तो खराब झालेला कॉम्प्युटर एका बॉक्समध्ये टाकायचा आणि तो बदलण्यासाठी ऍमेझॉनला पाठवायचा. त्याने हे अनेकदा केले होते आणि कंपनीला ही फसवणूक पकडता आली नाही. बऱ्याच दिवसांनी हा बनाव कंपनीच्या निदर्शनास आला मात्र तोपर्यंत कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक झाली होती. आता पोलीस त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.
हे प्रकरण नेहरू नगरमधील एका कॉम्प्युटर शॉपशी संबंधित आहे. पोलिसांनी येथे छापा टाकला आहे. पोलिसांनी सांगितले की, अमित कुमार रा. परसराम मार्ग यांच्या तक्रारीवरून अस्लम सय्यद रा. नेहरू नगर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे डिस्काउंट फॅक्टरी नावाने दुकान आहे. तो लोकांना कमी किमतीत चांगल्या दर्जाचे संगणक देत असे. त्याच्या जागेवर छापा टाकला असता 9 कॉप्युटर्स जप्त करण्यात आले. हे सर्व संगणक ऍमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.
अस्लमने आपल्या धूर्तपणाचा वापर करून कंपनीची फसवणूक केली. अनेक दिवसांपासून तो ही फसवणूक करत होता. वेगवेगळ्या नावाने संगणक विकत घ्यायचा आणि सर्वांच्या डिलिव्हरीसाठी दुकानाचा पत्ता टाकायचा. पेमेंट करण्यासाठी त्याने अनेक बॅंकांच्या क्रेडिट कार्डचाही वापर केला. संगणक बदलल्यानंतर वेगवेगळ्या ग्राहकांची नावे कधी आली हे कंपनीला समजू शकले नाही. नंतर बदलण्यात येणाऱ्या सर्व संगणकांचे पत्ते तपासले असता ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी दुकानात ठेवलेले सर्व संगणक जप्त केले आहेत.