पुणे – ऍमेझॉन कंपनीतून बोलत असल्याचे भासवून गिफ्ट देण्याच्या आमिषाने एकाची 1 लाख 7 हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात अला आहे. त्याने वेगवेगळ्या चार ते पाच बॅंक खात्यात ही रक्कम ऑन लाईन पध्दतीने वर्ग करण्यास भाग पाडली आहे.
याप्रकरणी डॉ. रॉबीन प्रमोद चौधरी(33,रा.वानवडी, मुळ बिहार) यानी तक्रार दिली आहे. रॉबीन चौधरी हे कमांड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते. ते 14 ऑक्टोबर रोजी ऍमेझॉनवर खरेदी करत होते. ऑन लाईन खरेदी करत असताना त्यांना लिंकवर एक जाहीरात दिसली. त्यावर त्यांनी क्लिक केले असता, त्यांना समोरुन एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने तुम्ही ऍमेझॉनवर ज्या वस्तू खरेदी करत आहात, त्यावर तुम्हाला थेट 20 टक्के सवलत देतो. ही सवलत ऍमेझॉनचे कमिशन वगळले गेली असल्याने मिळणार आहे. तसेच खरेदीवर एक आकर्षक गिफ्टही मिळेल असे आमिष दाखवले. यामुळे त्यांनी ऍमेझॉनवर खरेदी केलेल्या 33 हजाराच्या वस्तू त्याच्याकडून खरेदी केल्या. यासाठी त्याला ऑन लाईन पध्दतीने 33 हजार रुपये वर्ग केले.
यानंतर समोरील व्यक्तीने कॉल करुन पैसे मिळाले नाहीत पुन्हा वर्ग करा म्हणत पुन्हा 33 हजार देण्यास भाग पाडले. यानंतर त्यांना बिल 33 हजार 190.90 पैसे झाले असून तुम्ही 33 हजार 190. 09 पैसे वर्ग केल्याचे सांगत तीसऱ्यांदा पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. तीसऱ्यांदा पैसे वर्ग केल्यावर रॉबीन यांनी अगोदर दिलेले 66 हजार रुपये रिफंड करण्यास सांगितले.
यावर समोरील व्यक्तीने तुमच्या पत्नीचे बॅंक खाते असेल तर त्याची माहिती पाठवा त्यावर रिफंड पाठवतो असे सांगितले. रॉबिन यांनी त्याप्रमाणे पत्नीचे बॅंक डिटेल्स पाठवले. पुन्हा समोरील व्यक्तीने खात्यात किती पैसे आहेत, असे विचारल्यावर रॉबि यांनी 13/14 हजार रुपये असल्याचे सांगितले. यानंतर त्यांने रॉबिन यांना फोनवर आलेल्या ओटीपी विचारला. ओटीपी मिळताच त्याने रॉबिन यांच्या पत्नीच्या खात्यातीलही 12/13 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस करत आहेत.