पिंपरी – चिंचवडहून थेरगावकडे पवना नदीतून येत असताना दोन तरुण बुडाले होते. या दोन्ही तरुणांचे मृतदेह सोमवारी सापडले आहेत.थेरगाव येथे रविवारी (दि. 14) सायंकाळी चार तरुण पडले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले होते. सोमवारी सकाळी एकाचा तर दुपारी दुसऱ्या तरुणाचा मृतदेह मिळून आला. पिंटू विठ्ठल गायकवाड (वय 35) आणि ओम प्रकाश जाधव (वय 25, दोघेही रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कॉलनी, काळेवाडी) अशी बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर रवी राजकुमार गायकवाड (वय 13), नरसिंग महादेव जाधव (वय 21), अशी बचावलेल्या तरूणांची नावे आहेत.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चारही तरुण क्रिकेट खेळून नदी पात्रा जवळून थेरगावकडे येत होते. त्यावेळी पाठीमागून कोणीतरी पळा पळा असा आवाज दिला. यामुळे त्या चारही तरुणांनी नदीत उडी मारली. त्यामध्ये दोन जणांना वाचवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्यास सुरवात केली. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणांचा शोध लागलेला नव्हता. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह एनडीआरएफच्या पथकाने शोधून काढला.