नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात भाजपाचे कर्नाटकमधील आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाईदेखील करण्यात आली. विशेष म्हणजे ही लाच आमदार मडल विरुपक्षप्पा यांच्याच कार्यालयात स्वीकारली जात होती. त्यानंतर त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यातही कोट्यवधींचे घबाड सापडले होते. यासर्व कारवाई दरम्यान, आमदार मडल विरुपक्षप्पा हे मात्र भूमिगत झाले होते. दरम्यान, काल त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते पुन्हा सगळ्यांसमोर आले. यावेळी दिलेल्या त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकायुक्त पोलिसांनी कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयात त्यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना एका व्यावसायिकाकडून ४० लाखांची लाच घेतान रंगेहाथ अटक करण्यात आली होती. दरम्यान, हे सगळे पैसे व्ही प्रशांत विरुपक्षप्पा यांच्यावतीनेच स्वीकारत असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर विरुपक्षप्पा गायब झाले होते. अखेर मंगळवारी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर ते सर्वांसमक्ष हजर झाले. यावेळी आपल्या घरी सापडलेले पैसे हे कौटुंबिक व्यवसायातून आल्याचे ते म्हणाले.
“मला १०० टक्के खात्री आहे की या प्रकरणात मी निर्दोष सिद्ध होईन. माझ्या घरात सापडलेली रक्कम लाचेच्या माध्यमातून जमा केलेली नाही. कौटुंबिक व्यवसाय आणि शेतीतून आलेला तो पैसा आहे. आमचा सुपारी उत्पादनाचा व्यवसाय आहे. माझ्याकडे सुपारीचं १२५ एकर शेत आहे. इतरही व्यवसाय आहेत. मी त्याचे पुरावे सादर करून माझे पैसे परत घेईन”, असे विरुपक्षप्पा म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी त्यांनी दिलेली एक प्रतिक्रिया चर्चेत आली. “चन्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा व्यवसाय होतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या घरीही ४-५ कोटी सापडू शकतात. आमचे खूप सारे व्यवसाय आहेत. त्यामुळे ६ कोटी ही काही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. मी यासंदर्भात लोकायुक्तांना योग्य ती कागदपत्र सादर करेन”, असे विरुपक्षप्पा म्हणाले आहेत.