पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयात बिटकॉईन प्रकरणात तपास करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्याच मागे चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला आहे. याप्रकरणी दिवस-रात्र एक करत सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तपासाला जुंपण्यात आले आहे. तपासाच्या फाइलींचे ढिगारे तयार झाले आहेत.
मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांच्या विरुद्ध अद्याप ठोस अशी कोणतीच माहिती हाती आलेली नाही. मात्र, मॅडम साहेबांच्या मर्जीसाठी तपास सुरू ठेवण्यात आला आहे. संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात काही ना काही तरी हाती लागेल आणि मॅडम साहेब खुश होतील, अशी आशा आयुक्तालयात बसलेल्या वरिष्ठांना आहे.
पोलीस आयुक्तालयातील विश्वसनीय सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मॅडम साहेबांच्या मर्जीतीलच सायबर तज्ज्ञाने तपासातील रिकव्हर केलेले बीट कॉइन लाटल्याचे उघड झाले होते. त्यामुळे तोंडी आदेशावरुन संबंधीत अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी लावण्यात आली आहे. मात्र, सरकार बदलले आणि तपास खासगी सायबर तज्ज्ञाशी थांबला. तो पुढे गेला असता तर मॅडम साहेबा अडचणीत आल्या असत्या.
आता, पुन्हा मर्जीतले सरकार आल्याने मॅडम साहेबांच्या आदेशानुसार मागील सर्व तपासाच्या फाइली काढण्यात आल्या. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनीच बीट कॉइन लाटले, असा तपासाचा रोख ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांचे एक पथक सायबर सेलमध्ये तपास करु लागले.
दिवस-रात्र फाइलींचे ढिगारे उपसूनही हाती काही लागले नाही. त्यानंतरही तपास थांबवण्यात आला नाही. दुसरीकडे प्रकरणाची चर्चा सार्वजनीक झाल्यावर मात्र आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सोयीस्कररित्या तपास थांबवल्याची पुडी सोडली. मात्र, वस्तुस्थिती तशी नसून तपासासाठी दिवस-रात्र एक करण्यात येत आहे.
…..म्हणून चौकशीचा ससेमीरा
बिटकाॅइनमध्ये आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत अमित व विवेक भारद्वाज या दोघांनी सुमारे ४५०पेक्षा अधिक जणांना आर्थिक गंडा घातला होता. २०१८ मध्ये दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. पुणे पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी अमित भारद्वाजसह १७ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून फक्त २४१ बिटकॉइन जप्त करण्यात आले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस महासंचालकांकडून सप्टेंबर २०२० मध्ये फेरचौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाला.
फॉरेन्सिक ऑडिट नंतर पोलिसांनी दोन सायबर तज्ज्ञांना ताब्यात घेतले. बिटकॉइन प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेला डाटा हा विश्वासाने या दोघांकडे दिला होता. परंतु, त्यांनी या डाटाचा गैरफायदा घेत एका तज्ज्ञाने आरोपीच्या वॉलेटमधील बिटकॉइन स्वत:च्या तसेच इतर साथीदारांच्या वॉलेटवरही वर्ग केल्याचे आढळून आले. हा तज्ज्ञ मॅडम साहेबांच्या मर्जीतील होता. तो नुकताच जामिनावर सुटला आहे. त्याने स्वत:च्या अटकेचा बदला तत्कालीन तपास अधिकाऱ्यांमागे चौकशीचा ससेमीरा लावून घेण्यास सुरवात केली आहे.