आई मला झाडायला येऊ देना गं!

शंकर दुपारगुडे
कोपरगाव  – एके दिवशी पहाटे कोपरगाव शहरातील बसस्थानकासमोरचा मुख्य रस्ता झाडून काढत एक बालक आनंदाने आपल्या आईला मदत करीत होता. पहाटेची बोचरी थंडी, रस्त्यामध्ये पडेला कचरा, त्या कचाऱ्यातील गुटख्यांच्या पुड्या तो स्वत: हाताने उचलून आईला सफाई कामात मदत करीत होता. स्वच्छतेमध्ये मंत्रमुग्ध होऊन कोणाचीही पर्वा न करता पायात चप्पल नाही. अंगावर गरम कपडे नाही. स्वत:च्या उंची पेक्षा दुपटीने असलेला झाडू हातात घेवून रस्त्याची स्वच्छता करीत असतांना दै. प्रभातच्या प्रतिनिधीच्या कॅमेऱ्यात टिपला गेला.

मी बालक आहे पण सुजाण नागरिकांप्रमाणे मला वागता येत नाही. मी गुटखा, पान-तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकत नाही किंवा रस्त्यावर कचरा करणार नाही. सुजाण नागरिकांनी केलेला हा कचरा माझ्या शहरात मला सहन होत नाही. किंवा तो कचरा काढतांना माझ्या आईला त्रास होऊ नये, म्हणून की काय? तीला तो मदत करीत होता. झाडूने रस्ता साफ करता करता येणाऱ्या जाणाऱ्यांची मने साफ केल्यासारखे काम हा चिमुकला भल्या पाहटे करीत होता. तो करीत असलेल्या कामाचा अनेकांना हेवा वाटला, तर काहींना दुख: ही वाटले. परंतु त्याची कृती सुज्ञ नागरिकांसाठी सूचना होती.

दरम्यान हा बालक आपल्या आईबरोबर भल्या पाहटे कोपरगाव शहरात स्वच्छतेचे काम करीत आईला मदत करत होता. यावेळी आई त्याला म्हणत होती तू झाडू मारू नको. मला कोणीतरी बोलतील, असे म्हणत ती त्याला अनेक वेळा बाजूला करूनही तो काही झाडू हाताल सोडत नव्हता. आईबरोबरचं त्याच जिव्हाळयाच नातं होतं. म्हणूनच आई जे काम करत होती. त्याच्याशी व आईशी एक अतूट नाळ’ जोडल्याने उलट आईला भावनिक साद घालत म्हणत होता.

आई मला झाडायला येऊ दे ना वं
माझा सगळा अभ्यास झालाय
मी तुझं सगळ काम करतो
झाडू दे नं वं
रोज सकाळी उठायचं
शहराचे रस्ते झाडायचे

अशी भावनाच त्याच्या मनात रूजली असावी म्हणूनच आईने विरोध केला तरीही स्वच्छतेचे काम तो आनंदाने करतांना दिसून आला. या चिमुकल्याच्या कर्तव्याला किती स्टार मिळणार. कोपरगाव नगरपालिकेला ओडीएफ डबल प्लस मानांकन मिळाले आहे. हागणदारीमुक्त झालेलं हे शहर आता कचरा मुक्त करून थ्री स्टार रेटिंग मानांकन मिळविण्याची तयारी करीत आहे. पण या चिमुकल्याने केलेल्या कामाचा कोपरगावकर कोणता बोध घेणार आणि त्याला किती स्टार देणार, हे महत्त्वाचे आहे.

स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा हा मूलमंत्र प्रत्येकान जपला, तर बालकांना हातात झाडू घेऊन मुख्य रस्त्यावर विखूरलेला कचरा गोळा करण्याची वेळ येणार नाही. शहरामध्ये प्रत्येक नागरिकाने कचऱ्याचे नियोजन योग्य प्रकारे केले, तर शहराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. जसे स्वच्छता करणाऱ्या बालकाची नाळ त्याच्या आईशी आणि तिच्या कामाशी जोडली आहे. तशी सर्व नागरिकांची नाळ या शहराशी अंतर्मनातून जुळली, तर शहर स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here