बर्मिंगहॅम – सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या नाबाद 84 धावा (176 चेंडूंत 9 चौकार, 2 षटकार)आणि ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ऍशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत, 4 बाद 188 अशी समाधानकाराक मजल मारली.
ख्वाजाच्या साथीत कॅमेरून ग्रीनने 47 चेंडूंत 21 धावा करुन ऑस्ट्रेलियाने तूर्तास फॉलोऑनचा धोका टाळण्यात यश मिळवले. उपहारानंतर, ट्रॅव्हिस हेडला त्याचे अर्धशतक झाल्यानंतर लगेचच मोईन अलीने बाद केले.
हेडचा झेल 50 धावांवर जॅक क्रॉलीने घेतला. त्यापूर्वी, कालच्या बिनबाद 14 धावांवरुन खेळण्यास पुढे सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आज पहिल्या सत्रात स्थिरावून खेळू शकले नाहीत. कालच्या धावसंख्येत अवघ्या एका धावेची भर घातलेल्या डेव्हिड वॉर्नरला स्टुअर्ट ब्रॉडने त्रिफळाबाद केले. वॉर्नरला ब्रॉडने अशा प्रकारे 15 व्यांदा बाद केले. त्यानंतर आलेल्या फॉर्मातल्या मार्नस लाबुशेनचा (0) पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने झेल घेतला, तोही ब्रॉडच्याच गोलंदाजीवर.
ख्वाजा व स्टीव्हन स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेन स्टोक्सने स्मिथला अवघ्या 16 धावांवर पायचित पकडले. मग मात्र सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. ख्वाजाने आपले कसोटी अर्धशतकही पूर्ण केले.
इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने 31 धावांत 2 तर मोईन अली आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक गडी बाद केले.