प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 – पालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात गेल्या काही दिवसांत वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दरम्यान, ही परिस्थिती शॉर्टसर्किटमुळे निर्माण होत असून, या समस्येला परिसरात पक्षी जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांत चार ते पाच वेळा या ठिकाणी पक्षांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. यापूर्वी वर्षभरात एक ते दोन घटना घडत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पक्षांची संख्या वाढल्याचेही समोर आले आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र शहरातील सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प आहे. येथून सर्व पेठांसह कोथरूड आणि चतु:शृंगी परिसराला पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प 24 तास सुरू असल्याने त्यासाठी उच्च क्षमतेच्या वीज वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा केला जातो.
तेथे महावितरणचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. यावर कबुतरे तसेच कावळे बसण्याचे प्रमाण अधिक आहे. या पक्ष्यांमुळे सातत्याने वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. ही सुविधा पूर्ववत होण्यास कालावधी जात असल्याने त्याचा फटका पाणी पुरवठ्याच्या नियोजनास बसत आहे. परिणामी, वेळापत्रक कोलमडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यावर काय उपाय करता येईल, याचा शोध पालिका प्रशासन युद्ध पातळीवर घेत आहे.