मुंबई –अमेरिकेतील निवडणुका आणि करोनाचे वाढत असलेले रुग्ण यामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती अनिश्चित असूनही शेअर बाजार निर्देशाकांची आगेकूच चालू आहे. मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 503 अंकांनी म्हणजे 1.27 टक्क्यांनी वाढून 40,261 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 144 अंकांनी वाढून 11,813 अंकांवर बंद झाला.
निर्देशांक का वाढत आहेत…
अमेरिका व चीनची अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश देत आहेत. भारतातील मॅन्युॅफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. जीएसटीचे संकलन वाढले आहे. दुसऱ्या तिमाहीत बहुतांश बॅंकांनी अपेक्षेपेक्षा चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे बॅंकांच्या शेअरची खरेदी वाढून निर्देशांकांना आधार मिळत आहे. इतर कंपन्यांच्या ताळेबंदातील नफा वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्था खात्रीने पूर्वपदावर येत असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे, या कारणामुळे निर्देशांक वाढत असल्याचे ब्रोकर्सना वाटते.
एंजेल ब्रोकिंगचे विश्लेषक सुमित चव्हाण यांनी सांगितले की, बऱ्याच संदिग्ध परिस्थितीतही
निर्देशांक वाढत आहेत. मात्र अमेरिकेच्या होत असलेल्या निवडणुका पाहता पुढील दोन दिवस गुंतवणूकदारांनी अधिक सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला 11,500 व 11,550 अंकावर चांगला आधार आहे.
आजच्या कामकाजात राष्ट्रीय शेअरबाजारातील 11 पैकी 8 क्षेत्राचे निर्देशांक वाढले. यात बॅंका, वाहन, धातू, सरकारी कंपन्या आणि खासगी बॅंकांचा वाटा जास्त होता. या क्षेत्राच्या निर्देशांक 1 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र, रिऍल्टी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने मार खाल्ला.