तिरुअनंतपुरम – केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे बाल लैंगिक शोषणासंबंधी संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीने बुधवारी सकाळी समुद्रात उडी मारली.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, आरोपीला कासारगोड जिल्ह्यातील कसाबा येथे पुरावे मिळविण्यासाठी घेऊन जात होते, तेव्हा ही घटना घडली. आरोपी महेश याच्याविरोधात त्याच्या शेजाऱ्याने तक्रार केली होती. त्यानंतर आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणासाठी पुरावे गोळा करण्यासाठी आरोपीला समुद्रकिनारी घेऊन गेले. त्याचवेळी आरोपी महेशने समुद्रात उडी मारली. त्याला पकडण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांनीही समुद्रात उड्या मारल्या. मात्र, त्यांना आरोपी सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता आरोपीचा समुद्रात शोध सुरू केला आहे.