मदुराई – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला. लस घेतलेल्या नागरिकांना करोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली. मात्र लस घेणाऱ्यांना करोनाची लागण झाली तरी फारसा त्रास होत, असं सांगण्यात येत आहे. त्यातच आता लस घेणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 तासाच्या आत सरकारी राजाजी रुग्णालयात (GRH) जात असताना इंजिनिअर तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. डी अँड्र्यू सायमन असे मृत तरुणाचे नाव आहे. तो न्यू विलांगुडी येथे राहत होता.
सायमन युकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तो मदुराईला आपल्या मूळ गावी परतला होता. त्यानंतर तो वर्क फ्रॉम होम करत होता.
सायमनच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमननं चार महिन्यांपूर्वी बेंगळुरूस्थित कंपनीत रुजू झाला होता. मात्र तो घरूनच काम करत होता. तसेच त्याच तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.
शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास सायमनने पत्नीसोबत सत्यमूर्ती नगर येथे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. रात्री दोघांनाही अंगदुखी झाली होती. मात्र सकाळी सायमन बाथरुममध्ये गेला असता कोसळला. त्याला खासगी रुग्णालयाने नकार दिल्यानंतर सायमनने जीआरएच येथे दाखल करण्यात आलं. मात्र तिथेच त्याची प्राणज्योत मावळली.
दरम्यान जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. केव्ही अर्जुन कुमार यांनी सांगितले, लसीकरणानंतरच्या प्रतीक्षा केंद्राच्या निरीक्षणामध्ये असताना लसीवर तत्काळ प्रतिक्रिया आल्याचा पुरावा नाही.