पुणे – समर्थ पोलीस स्टेशनच्या मोबाईल मिसींगचा तपास पथकाने तांत्रीक शोध घेवून सर्वसामान्य नागरीकांचे 12 मोबाईल परत मिळवून दिले. नागरीकांना विश्वास बसत नव्हता की आमचा मोबाईल परत मिळेल.त्यांचा हरवलेला मोबाईल परतमिळाल्याचा सुखद आनंद त्यांचे चेह-यांवर स्पष्टपणे दिसून येत होता.
ब-याचदा घाईगडबडीत नागरिकांचे मोबाईल वेगवेगळ्या कारणाने गहाळ होतात अगर चोरीला जातात. समर्थ पोलीस ठाणे हद्दीमध्ये नागरीकांचे मोबाईल फोन हे वेगवेगळया ठिकाणी गहाळ झाले होते. नागरीकांनी त्याच्या तक्रारी पुणे पोलीस वेबसाईटवर लॉस्ट ऍण्ड फाऊंड पोर्टलवर ऑन लाईन तक्रार नोंद केल्या होत्या. समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष मोरे यांनी गहाळ मोबाईलधारक यांचे सेवापुरवठादार मोबाईल कंपनींना पत्रव्यवहार करुन त्यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला.
समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये जून -2020 पासून जून-2021 या काळात जवळजवळ 60 मोबाईल गहाळ झालेबाबतच्या ऑनलाईन तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या कालावधीमध्ये सेवापुरवठादार मोबाईल कंपनींना पत्रव्यवहार करुन त्यांचेकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रात व परराज्यात (कर्नाटक, उत्तर प्रदेश) गहाळ झालेला मोबाईल सध्या वापरत असलेल्या वापरकर्त्यासोबत संपर्क साधला.
संबंधित मोबाईलधारक यांची माहिती प्राप्त होताच संबंधित वापरकर्ते यांचेकडे पाठपुरावा करुन ते वापर करीत असलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी पुणे पोलीसांकडे नोंद असल्याची माहिती देऊन ते मोबाईल फोन पोलीस ठाण्यात आणून जमा करण्याचे कळविले होते. गहाळ झालेल्या 60 मोबाईलपैकी 34 मोबाईल परत हस्तगत करण्यामध्ये समर्थ पोलीस स्टेशनचे तपास पथकास यश प्राप्त झालेले आहे. गहाळ 34 मोबाईलपैकी 22 मोबाईल यापुर्वी मे-2021मध्ये संबंधीत मोबाईल मालकास परत करण्यात आलेले आहेत.
उर्वरीत हस्तगत करण्यात आलेले 12 मोबाईल दि. 3/7/21 रोजी परत करण्यात आले. उपनिरीक्षक विशाल मोहिते पोलीस अंमलदार सुभाष मोरे, सुभाष पिंगळे, सुशील लोणकर, संतोष काळे,सुमित खुट्टे, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले, यांनी सदर कामगिरी केलेली आहे.